गोंदिया : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा ग्राफ कमी होत असल्याचे बघून जिल्हा प्रशासनाने निर्बंध शिथिल करताच शहरवासी रस्त्यावर उतरल्याचे दिसत आहे. यामुळेच शहरातील रस्त्यांवर दुपारी २ वाजतापर्यंत गर्दी होत असून कोरोना पूर्णपणे जिल्ह्यातून गेल्याचे वाटत आहे. मात्र मागील वर्षीही शिथिलता मिळाल्यानंतर शहरवासीयांनी अतिरेक केला होता. त्यानंतर कोरोना कहराचा सामना करावा लागला होता. शहरात वाढत चाललेली गर्दी आता ‘धोक्याची घंटा’ देत असून, यंदा मात्र त्या परिस्थितीची पुनरावृत्ती नको असल्यास तेव्हा झालेली चूक करता कामा नये.
मागील वर्षी कोरोनाचा कहर कमी झाल्यानंतर प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली होती. दुकाने उघडण्यास परवानगी देत हळूहळू त्यांची वेळ वाढवून देण्यात आली होती. यंदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मागील वर्षापेक्षा जास्त कहर केला असून, त्याची दहशत आजही कित्येकांच्या मनात कायम आहे. मात्र आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे बघून व्यापारी व नेते मंडळी बाजार व दुकान उघडण्यासाठी जोर देऊ लागले. परिणामी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. यात आता सर्वच दुकाने व बाजारासाठी दुपारी २ वाजतापर्यंतची वेळ ठरवून देण्यात आली आहे.
मात्र दिलेली ही सूट नागरिकांना कोरोना जिल्ह्यातून पूर्णपणे गेल्यामुळे दिल्यासारखी वाटत आहे. हेच कारण आहे की, शहरातील रस्ते आता गर्दीने खचाखच भरू लागले आहेत. बाजारात दुपारी २ वाजतापर्यंत पाय ठेवायला जागा नसते असे म्हणणे वावगे ठरणार नाही. यात पुरुषांसोबतच आता महिलांचीही गर्दी वाढू लागली आहे. विशेष म्हणजे, कित्येक जण आता दोन महिन्यांपासून घरात कोंडल्याने विनाकारण बाहेर फिरण्यासाठी पडत असल्याचेही दिसते. मात्र ही गर्दी ‘धोक्याची घंटा’ असून कोरोनाचा कहर पुन्हा वाढू नये यासाठी आताच आपली चूक सुधारण्याची गरज आहे.
---------------------------
नियमांच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष
व्यापाऱ्यांना दुकान उघडण्यासाठी दुपारी २ वाजतापर्यंतची वेळ देण्यात आली आहे. मात्र यासोबतच कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र वास्तवात कुणीही नियमांचे पालन करताना दिसत नाही. ग्राहक आला तोच देव पावला, असे व्यापाऱ्यांना वाटत असून नियमांची धुडकावणी सुरू आहे. विशेष म्हणजे प्रशासनाच्या कोणताही विभाग वा पथकाचे याकडे लक्ष नाही.
----------------------------------
एकाच व्यक्तीने बाहेर पडावे
घरातील सामान आणण्यासाठी घराबाहेर पडावे लागते यात शंका नाही. मात्र वारंवार एक-एक सामान आणण्यासाठी बाहेर पडणे हे सयुक्तिक नाही. शिवाय कुण्या एका व्यक्तीनेच सामान आणले तरी चालते. मात्र शहरात बघता कित्येक जण सामानाच्या नावावर नुसते फिरण्यासाठी बाहेर पडत आहेत. यात महिलांचीही कमी बाजारात दिसून येत नाही. मात्र आपल्या सुरक्षेसाठी गांभीर्याने घेण्याची गरज आहे.