लोकमत न्यूज नेटवर्कपरसवाडा : पारंपरिक धान शेतीला फाटा देत एका शेतमजुराने चक्क आपल्या शेतात पांढरे सोने उगविले असून हे पांढरे सोने त्याच्या शेतात मोठ्या ऐटीने डोलत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.तिरोडा तालुक्यातील ग्राम चांदोरी खुर्द येथील टेकलाल वामन भोयर नामक शेतमजुराचा हा यशस्वी प्रयोग आहे. कुणाच्याही मार्गदर्शनाशिवाय आपल्या अनुभवाच्या आधारावर त्याने भल्याभल्यांना मागे टाकत ही कामगिरी करून दाखविली आहे.तिरोडा तालुक्यातील ग्राम चांदोरी खुर्द येथील शेतमजूर टेकलाल भोयर हे वर्धा जिल्ह्यातील सेलु तालुक्यातील घोराड गावात काम करीत होते. तेथेच त्यांनी कापूस लागवडीचा अनुभव घेतला व गावी परतून शेती भाड्याने घेतली. येथे त्यांनी पहिल्यांदाच कापूस लागवडीचा प्रयोग केला. जमिनीची पोत कशी असावी, स्वत: आयुर्वेदीक औषध तयार करून त्याची फवारणी, खत टाकणे या सर्व अनुभवाचा वापर त्यांनी येथे केला. परिणामी, त्यांच्या शेतात आज पांढरे सोने ऐटीने डोलत आहे. जिल्ह्याला धानाचा कटोरा म्हटले जात असून येथील शेतकरी फक्त धानाच्या मागेच राहतात. मात्र टेकलाल भोयर यांनी कापसाची लागवड करून धानावरच अवलंबून राहता पीक बदल करण्याचा संदेश दिला आहे.विशेष म्हणजे, कृषी विभागाकडून बागायती भाजीपाला, फुलशेती, केळी, पॉली हाऊस, गहू, चना यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहीत करून मोठमोठे शिबिर घेतले जाते. यासाठी जाहिरात केली जाते. मात्र कापसासाठी कोणत्याही कृषी अधिकारी व लोकप्रतिनिधीने पुढाकार घेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले नाही. मात्र भोयर यांनी आपल्या अनुभव जिद्दीने उसनवारीवर पैसे घेऊन धानाच्या जिल्ह्यात कापसाचा यशस्वी प्रयोग करून दाखविला. आता कापूस काढण्यास सुरुवात करणे सुरु होणार असून पाच ते सहा लाखांचे उत्पन्न होणार. विशेष म्हणजे, हा अनुभवाचा अन्य शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू असे ही त्यांनी सांगीतले.कृषी विभागाबद्दल व्यक्त केली नाराजीभोयर यांनी पंचायत समिती कृषी विभाग, तिरोडा येथील कृषी अधिकारी कार्यालयाला लेखी अर्ज देवून काही मार्गदर्शन मागीतले होते. पण मार्गदर्शन तर दूरच मात्र एखाद्या अधिकाºयाने त्यांच्या शेतात साधा फेरफटकाही मारला नाही. हाच प्रयोग एखाद्या मोठ्या शेतकऱ्याचा किंवा लोकप्रतिनिधीचा असता तर त्याला बघण्यासाठी हजारो शेतकºयांना शेतावर नेले असते व उदोउदो केला असता अशी शोकांतीका व्यक्त करीत त्यांनी कृषी विभागाबद्दल नाराजी व्यक्त केली. याकडे जिल्हाधिकारी व कृषी अधिकाऱ्यांनी भोयर यांच्या शेतातील पिकाची पाहणी करावी अशी या शेतकऱ्याची मागणी आहे.
चांदोरीत उगवले पांढरे सोने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 9:00 PM
पारंपरिक धान शेतीला फाटा देत एका शेतमजुराने चक्क आपल्या शेतात पांढरे सोने उगविले असून हे पांढरे सोने त्याच्या शेतात मोठ्या ऐटीने डोलत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
ठळक मुद्देशेतमजुराने केला प्रयोग : पाच एकरात कापूस व तुरीची लागवड