गोंदिया(वडेगाव) - माजी आमदाराच्या फार्म हाऊसवरील चौकीदाराचा खून झाल्याची घटना सोमवारी (दि.१६) रोजी तिरोडा तालुक्यातील मारेगाव येथे उघडकीस आली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. हरी जागो येळे (५८) रा. भजेपार, असे खून झालेल्या चौकीदाराचे नाव आहे. माजी आमदार डॉ.खुशाल बोपचे यांचे मारेगाव येथे फार्म हाऊस आहे. हरी हा मागील तीन वर्षांपासून तिथे चौकीदार म्हणून काम करित होता. प्राप्त माहितीनुसार १५ आॅक्टोबरच्या रात्री हरी फार्म हाऊसवर नेहमीप्रमाणे चौकीदारी करीत असताना अज्ञात इसमांनी त्याच्यावर लोखंडी सळाखीने वार करुन मारल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मृतकाच्या चेह-यावर सळाखीचे निशान असून उजवा हात मोडलेला होता. सदर हल्लेखोर फार्म हाऊसवर असलेल्या कोंबड्या व शेळ्या चोरीच्या हेतूने आले असावे व त्यांचा मज्जाव करताना हरीचा खून झाला असा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र खुनाचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास विशेष पोलीस पथकाचे सहायक पोलीस उपनिरीक्षक कैलास गौते करीत आहेत. मृतकाचा भाऊ महादेव जागो येळे (५५) रा. भजेपार यांचे तक्रारीवरुन तिरोडा पोलिसांनी भादंवि कलम ३०२ अन्वये अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला. दरम्यान ग्रामपंचायत निवडणुकीच्या दिवशीच ही घटना घडल्याने विविध तर्क विर्तक लावले जात आहे.
गाेंदिया : माजी आमदारांच्या फार्म हाऊसवरील चौकीदाराचा खून, घटनेमुळे खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2017 6:14 PM