सुभाष बागेत राबविला उपक्रम : स्वच्छतेच्या वचनांची आदान-प्रदान कपिल केकत गोंदिया स्वच्छतेबाबत शहरवासीयांत जनजागृती करण्यासाठी ग्रीन गोंदिया फोरमच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या ‘स्वच्छता की ताली’ या उपक्रमाचा रविवारी (दि.२२) सकाळी येथील सुभाष बागेत शुभारंभ करण्यात आला. यात विद्यार्थ्यांनी बागेत फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांत स्वच्छतेबाबत जनजागृती करीत वचनाची देवाण-घेवाण केली. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या या प्रयत्नाला दाद देत नागरिकांनीही त्यांच्या टाळी ला टाळी दिली. देशाला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी शासनाची धडपड सुरू आहे. स्वच्छतेसाठी शासनाकडून वेगवेगळे प्रयोग अंमलात आणले जात आहेत. मात्र स्वच्छतेची ही सुरूवात स्वत: पासून करावयाची गरज असून याबाबत जनजागृती करण्याची गरज आहे. नेमकी हीच बाब हेरून शहरातील निसर्ग प्रेमी मंडळांनी एकत्र येवून ‘ग्रीन गोंदिया फोरम’ची स्थापना केली आहे. तयार करण्यात आलेल्या मंचने स्वच्छतेच्या या जनजागृतीसाठी ‘स्वच्छता की ताली’ हा उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी ते नगर परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना सोबत घेत आहेत. ‘स्वच्छता की ताली’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थी दर रविवारी शहरातील वेगवेगळ््या भागांत जावून प्रत्येक घरासमोर टाळी वाजविणार आहेत. या टाळीच्या माध्यमातून ते त्या घरच्या व्यक्तींना ‘मी’ स्वत: स्वच्छता राखणार असे वचन देणार असून ‘त्या’ व्यक्तीकडूनही स्वच्छता राखणार असे वचन घेत जनजागृती करणार आहेत. अशाप्रकारे हे विद्यार्थी शहरातील प्रत्येकच घरापर्यंत जावून स्वच्छतेबाबत जनजागृती करणार आहेत. त्यानुसार, रविवारी (दि.२२) सकाळी येथील सुभाष बागेत ‘स्वच्छता की ताली’ गुंजली. येथे विद्यार्थ्यांनी बागेत सकाळी फिरण्यासाठी येत असलेल्या नागरिकांना ‘स्वच्छता की ताली’ या उपक्रम व स्वच्छतेबाबत माहिती देत जनजागृती केली. विद्यार्थ्यांनी मी स्वत: कचरा करणार नाही याचे वचन देत तुम्हीही यात सहभागी होत कचरा न करण्याचे वचन घेत त्यांच्याकडून टाळी घेतली. एकंदर सुभाष बागेत सकाळी विद्यार्थी व नागरिकांची टाळी चांगलीच गुंजली. विशेष म्हणजे स्वच्छतेसाठी सुरू असलेली विद्यार्थ्यांंची ही धडपड बघून नागरिकांनी त्यांच्या या उपक्रमाचे कौतूक करीत स्वच्छतेचे वचन दिले. विशेष म्हणजे या उपक्रमात दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची वाढ होणार आहे. १६ विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग ‘स्वच्छता की ताली’ या उपक्रमाची सुरूवात असल्याने रविवारी (दि.२२) पहिल्या दिवशी यात नगर परिषद संचालीत मनोहर म्युनिसिपल शाळेतील १३ विद्यार्थी, माताटोली शाळेतील दोन विद्यार्थी व जवळील ग्राम अंभोला येथील जिल्हा परिषद शाळेतील एक विद्यार्थिनी असे एकूण १६ विद्यार्थी सहभागी झाले होते. याप्रसंगी त्यांच्यासोबत नगर परिषदेचे अभियंता फिरोज बिसेन, आरोग्य निरीक्षक गणेश हतकय्या, ग्रीन गोंदिया फोरमचे प्रतिनिधी यादव कोहळे व अन्य नगर परिषद कर्मचारी उपस्थित होते.
गुंजली ‘स्वच्छता की ताली’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2017 12:15 AM