संजय बंगळे
अर्जुनी-मोरगाव : गुरुपौर्णिमा चराचर सृष्टीतील सर्व गुरुवर्यांना वंदन करण्याचा हा दिवस असून गुरुपौर्णिमेला गुरू तत्त्व हे हजारपटीने कार्यरत असते. चंद्र पूर्णकलेने युक्त असतो. गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेसुद्धा म्हणतात. व्यास हे वशिष्ठ मुनीचे नातू व पाराशर ऋषींचे सुपुत्र होते. त्यांना वेदव्यासही म्हणत. ते ज्ञानी, भक्तिमार्गाचे आचार्य व उच्चकोटीचे कवी होते. त्यांनीच सर्व प्राणिमात्रांना ज्ञान देण्याची व्यवस्था केली म्हणून आषाढी पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असे नाव पडले. ‘व्यासोच्छिष्टं म जगत सर्वम,’ असे म्हटले जाते. व्यासाचे शास्त्र श्रवण करून हे पचनी पडल्याशिवाय विश्वात वनी खऱ्या अर्थाने आध्यात्मिक उपदेशक होऊ शकत नाही. यातच गुरूपरंपरेचे वात्सल्य दडले आहे. म्हणून जिथे तिथे आध्यात्मिक प्रवचने वगैरे धार्मिक कार्यक्रम सुरू होतात त्याला ‘व्यासपीठ’ असे म्हणतात.
महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार व मूलाधार आहेत. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र व मानसशास्त्र असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला. ज्ञानियांचा राजा म्हणून ज्याला मानतात त्या ज्ञानदेवांनीसुद्धा ज्ञानेश्वरी लिहिताना व्यासाचा मागोवा घेऊन ग्रंथाची सुरुवात केली. व्यास पौर्णिमेच्या दिवशी ‘ओम नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे’ अशी प्रार्थना करून त्यांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे. रामायण-महाभारत काळापासून गुरू-शिष्य परंपरा चालत आलेली आहे. आपण ज्यांच्यापासून विद्या प्राप्त करतो त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करतो. अशा गुरूंची आठवण म्हणून गुरुपौर्णिमेचे महत्त्व काय हे आपणास कळणे आवश्यक आहे. गुरूंचा आदर करणे हे आपले आद्यकर्तव्य होय. गुरुपौर्णिमा ही गुरुपूजा आहे. मग गुरू म्हणजे काय?
आजच्या आधुनिक युगात गुरूची ओळख करणे कठीण आहे. गुणांची ओळख करून गुरू बनविणे व शिष्य बनविणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. गुरू हा सद्गुण देणारा व दुर्गुण नष्ट करणारा असावा. गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमेला ज्ञानाचा प्रकाश गुरू शिष्याला देतात, तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा म्हणून गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. गुरू म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे; परंतु घटाने, घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याचप्रमाणे गुरूपुढे नम्र झाल्याशिवाय त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
गुरुपौर्णिमेची उद्दिष्टे : वर्षातून कमीत कमी एकदा गुरूच्या ऋणातून मुक्त होणे, पुढची प्रेरणा, तपश्चर्या पुण्याई प्राप्त करून घेणे. जगात गुरुपौर्णिमा पर्व भारतासोबतच दक्षिण अमेरिका, युरोप, जपान, चीन, तिबेट आदी ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. गुरुपौर्णिमेला प्रत्यक्ष परमात्मा अमृत वाटत असतात व यादिवशी आपण जो गुरूचा आदर, अगर गुरूला जे दान कराल ते हजारपटींनी वृद्धिंगत होते. गुरू अंधाराचा नाश करून शिष्यांना सर्वोच्च पदावर नेऊन पोहोचवितात म्हणजेच आपल्यासारखेच करतात. आधुनिक युगात विज्ञान अनुभव, त्याग, तपस्या, विवेक, वैराग्य, वत्सलता, अनुशासन प्रियता या ८ गुणांचे अष्टगंध लावलेला गुरू आदर्श असतो.