गोंदिया : नेट सेट उत्तीर्ण होऊन प्राध्यापक झाल्यानंतरही अनेक प्राध्यापकांना अद्यापही पूर्णवेळ नियुक्तीचे आदेश न मिळाल्याने त्यांना तासिका तत्त्वावरच मागील आठ ते दहा वर्षांपासून प्रति तासिका ४०० रुपयांप्रमाणे काम करावे लागत आहे. त्यातही आठवड्यातून केवळ ९ तासिका मिळत आहे. तर यंदा शासनाने तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना केवळ तीन महिन्यांच्या नियुक्तीचे आदेश देऊन बोळवण केली. त्यामुळे उर्वरित ९ महिने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना मोलमजुरी करून वेळ मारून न्यावी लागत आहे. काही तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांनी चहा टपरी टाकली तर काही रोजगार हमीच्या कामावर जात आहेत तर काही जण शेतमजुरी करीत आहेत. मात्र शासनाने अद्यापही तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची दखल घेतली नाही. त्यामुळे पदवी असूनसुद्धा रोजगार हमीच्या कामावर जाऊन आपल्या कुटुंबाचा गाडा पुढे नेण्याची वेळ आली आहे.
..................
नेट सेट बेरोजगारांची समस्या वेगळीच
- शासनाने प्राध्यपकांसाठी नेट सेट परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य केले. यामुळे बऱ्याच प्राध्यापकांनी मेहनत घेऊन ही परीक्षा उत्तीर्ण केली. मात्र ही परीक्षा उत्तीर्ण होऊन आठ ते दहा वर्षांचा कालावधी झाला तरी त्यांना अद्यापही नियुक्ती आदेश नाहीत. त्यामुळे लाख रुपयांचा पगार दूरच उलट इतर कामे करून आपला उदरनिर्वाह करावा लागत आहे.
- राज्यात प्राध्यापकांची ३५ हजारांवर पदे रिक्त आहेत. पण, अद्यापही शासनाने प्राध्यापकांची पद भरती काढली नाही. त्यामुळे नेट सेट उत्तीर्ण होऊनदेखील त्यांना तासिका तत्त्वावर काम करावे लागत आहे. त्यातही केवळ तीन ते चार महिन्यांचे नियुक्ती आदेश मिळत असल्याने त्यांची समस्या वेगळीच आहे.
..............
९ वर्षांपासून लटकला प्रश्न
शासनाने २०१२ पासून प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्यासाठी कुठलीच प्रक्रिया केली नाही. त्यामुळे रिक्त पदांचा आकडा ३५ हजारांवर पोहोचला आहे. दोन महिन्यांपूर्वी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी १५ दिवसांत प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही त्या आश्वासनाची पूर्तत: केली नाही. त्यामुळे तासिका तत्त्वावरील आणि नेट सेट अर्हताधारक उमेदवारांना तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागत आहे.
.............................
किती दिवस जगायचे असे!
मी नऊ वर्षांपूर्वी नेट सेट परीक्षा उत्तीर्ण केली; पण प्राध्यापकांची पद भरती करण्यात आली नाही. त्यामुळे तासिका तत्त्वावर काम करावे लागत आहे. त्यातही नियमितता नसल्याने विविध आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शासन केवळ आश्वासनावर वेळ मारून नेत आहे. त्यामुळे जगायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- मनोज आगलावे, तासिका तत्त्वावरील प्राध्यापक.
......
शासनाने मागील आठ-दहा वर्षांपासून तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची एक प्रकारे थट्टाच चालविली आहे. यंदा तर केवळ तीन महिन्यांच्या नियुक्तीचे आदेश देऊन आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा, असा प्रश्न आहे.
- विकास मानकर, तासिका तत्त्वावरील प्राध्यापक
.....
शासनाने मागील दहा वर्षांपासून प्राध्यापकांची रिक्त पदे भरली नाहीत. त्यामुळे तासिका तत्त्वावर खासगी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाची मर्जी सांभाळत काम करावे लागत आहे. याचा व्यवस्थापनसुद्धा स्वत:च्या फायद्यासाठी उपयोग करून घेत आहे.
- राहुल पारखी, तासिका तत्त्वावरील प्राध्यापक