गोंदिया : राम नगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बाजार चौक राम नगर परिसरातील वैष्णवी नर्सिंग होमच्या समोर असलेल्या भुजाडे यांच्या घरी भाड्याची खोली घेऊन गुटख्याचा साठा करणाऱ्या शुभम धनकुमार जैन (२८) याच्या गोदामावर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धाड घालून ४ लाख ३५ हजारांचा गुटखा जप्त केला आहे.
ही कारवाई शुक्रवारी (दि.२७) दुपारी करण्यात आली आहे. या धाडीत १७ प्रकारचे पानमसाला, विमल गुटखा, पानबहार पानमसाला, विमल पानमसाला, राजश्री पानमसाला, रजनीगंधा , विमल, रत्ना स्कॅनटेड तंबाखू, पानपसंद पानमसाला, झेन टोबॅको, बाबा १२०, बाबा १६०, सितार गुटखा, ईगल, तुलसी टोबॅको अशा प्रकारचा एकूण ४ लाख ३२ हजार ८०० रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त ए.पी.देशपांडे, अन्न निरीक्षक शीतल देशपांडे, भास्कर नंदनवार, महेश चहांदे यांनी केली आहे. आरोपीवर रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.