बोंडगावदेवी : येथील ग्राम सिलेझरीमध्ये कौलारू घरांवर माकडांनी बैठा सत्याग्रह सुरू केला आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसांत माकडांनी गावातील घरांवर हैदोस सुरू केल्याने सामान्य जनता कमालीची त्रस्त झाली आहे. पावसाच्या दिवसांमध्ये नाना प्रकारच्या वनस्पती जंगलामध्ये उपलब्ध आहेत. माकडांना खाद्य जंगलात उपलब्ध असताना त्यांनी गावाकडे आपला मोर्चा गावाकडे वळविला आहे.
शहरातील रस्ते दुरुस्तीची मागणी
गोंदिया : शहरातील कुडवा नाका ते तिरोडा रोड व दासगाव रस्त्यावरील खड्डे जीवघेणे ठरत आहेत. या रस्त्यांवर काही दिवसांपूर्वी दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र, ते खड्डे पुन्हा जसेच्या तसे झाले आहेत. या रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे
पुन्हा वाढला प्लास्टिक पिशव्यांचा वापर
गोंदिया : शहरासह जिल्ह्यात प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून, सगळीकडे प्लास्टिकचा कचरा दिसत असून, शासनाच्या आदेशाला तिलांजली मिळत आहे. प्रदूषणात होणारी वाढ थांबविण्यासाठी प्लास्टिक पिशव्या बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला.
झाशीनगर येथील बीएसएनएल टॉवर फक्त शोभेची वास्तू
धाबे पवनी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील झाशीनगर हे गाव नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील असून, गावची लोकसंख्या दोन हजार आहे. आधीच हे गाव पुनर्वसित असून, गावकरी अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. गावात वर्ग १ ते १२वीपर्यंत शिक्षणाची सोय आहे. परंतु, गेल्या दोन महिन्यांपासून येथील बीएसएनएल टॉवर बंद असल्यामुळे नेटवर्कअभावी मुलांच्या शिक्षणाची अडचण होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदेशाप्रमाणे शेतात ई-पीक ॲपद्वारे नोंद करणे आहे. शेतातील संपूर्ण पिकाची नोंदणी याद्वारे करणे आहे. गावांमध्ये बीएसएनएलच्या व्यतिरिक्त कुठल्याही टाॅवरची व्यवस्था नसल्यामुळे आणि गेल्या दोन महिन्यांपासून ते बंद असल्यामुळे गावातील मोबाईल निकामी ठरत आहेत. बीएसएनएल टाॅवर फक्त शोभेची वास्तू ठरत आहे. त्यामुळे ग्रामवासी चांगलेच त्रस्त झाले आहेत. या समस्येबद्दल अनेक वेळा आमदार-खासदारांना निवेदन दिले आहे. परंतु, आजपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही.