पावसाच्या दिवसांमध्ये नाना प्रकारच्या वनस्पती जंगलामध्ये उपलब्ध आहेत. माकडांना खाद्य जंगलात उपलब्ध असताना त्यांनी गावाकडे आपला मोर्चा वळविला आहे. आजही गावखेड्यात कौलारू घरे आहेत. माकडांमुळे गावकऱ्यांचे नुकसान होत आहे. घराजवळील वाडीमध्ये लावलेल्या वाल, कारले, कोहळा, लवकी आदी पिकांची नासधूस मोठ्या प्रमाणात होत आहे. गावात येणाऱ्या माकडांचा बंदोबस्त वनविभागाने करावा, अशी मागणी माजी सरपंच प्रकाश टेंभुर्णे यांनी केली आहे.
धान पिकावर किडीचा प्रादुर्भाव
सोनपुरी : वाढीच्या अवस्थेत असलेल्या धान पिकावर ढगाळ वातावरणामुळे कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. खोडकिडा, गादमाशी, तुडतुडे, करपा, पर्णकोष आदी किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कृषी विभागाच्या वतीने कीड व्यवस्थापनासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. मात्र तालुक्यात शेतकऱ्यांना कीड नियंत्रण करण्यात अपयश येत आले. कीटकनाशक औषधी अनुदानावर देण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
तालुक्याला जोडणारा रस्ता खड्डेमय
गोठणगाव : सार्वजनिक बांधकाम उपविभाग अर्जुनी-मोरगाव अंतर्गत सुकडी-गोठणगाव मार्गाची दुर्दशा झाली आहे.
तालुक्याला जोडणारा एकमात्र रस्ता आहे. अर्जुनी-मोरगाव ते भरनोली ६० किलोमीटर अंतर असून, या रस्त्याने नागपूर-प्रतापगड, साकोली-प्रतापगड, साकोली-कुरखेडा व साकोली-भरनोली बस सुरू आहे. परंतु गोठणगाव-सुकडी या मार्गावरील रामघाट रोड-सातबुड्या जोहाचे झाडापासून १ किलोमीटर अंतरावरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यातच रस्ता अतिशय खराब असल्याने बस बंद होण्याच्या मार्गावर आहेत. एक वर्षाआधी हे ठिकाण सोडून डांबरीकरण करण्यात आले, मात्र उखडलेल्या रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. डांबरीकरण करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.