लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : खरीप हंगामातील पिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव झाल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्चदेखील भरून निघाला नाही. वर्षभर राबराब राबून आणि रक्ताचे पाणी करूनदेखील काहीच हाती आले नाही. पण यामुळे खचून न जाता पुन्हा स्वत:ला धीर देत शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी केली. सुदैवाने यंदा पीकदेखील चांगले आले होते; पण मंगळवारी (दि. २८) सायंकाळच्यासुमारास झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. कालपर्यंत हिरवेगार दिसणारे पीक गारपीट आणि अवकाळी पावसामुळे आडवे झाल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा निसर्ग कोपल्याने त्यांना पुन्हा सावकार आणि व्यापाऱ्यांच्या दारात उभे राहण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामांत धानासह तूर, लाखोळी, गहू, हरभरा, जवस, करडई या पिकांची लागवड केली जाते. यंदा जिल्ह्यात २४३३४ हेक्टरवर रब्बीचे नियोजन करण्यात आले होते. यापैकी प्रत्यक्षात २३०४३ हेक्टर विविध पिकांची लागवड करण्यात आली. यंदा सरासरीच्या तुलनेत समाधानकारक पाऊस झाल्याने सर्वच सिंचन प्रकल्पांत ६० टक्केवर पाणीसाठा आहे. त्यामुळे रब्बीचे पीक हमखास निघणार, या आशेने शेतकऱ्यांनी धानासह इतर पिकांची लागवड केली. सुदैवाने सुरुवातीला वातावरणसुध्दा अनुकूल मिळाल्याने पिके चांगली भरून आली होती. मात्र मंगळवारी सायंकाळच्यासुमारास झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतातील उभी पिके आडवी झाली. गहू, हरभरा, तूर या पिकांना सर्वाधिक फटका बसला. शेकडो हेक्टरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कालपर्यंत शेतात उभी असलेली डौलदार पिके पाहून समाधानी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात मंगळवारी गारपीट आणि अवकाळी पावसाने पाणी आणले.
नुकसानीचे पंचनामे सुरू- अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. महसूल आणि कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात सुमारे ४६२ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याची बाब पुढे आली आहे. यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता असून, गहू आणि हरभरा पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. भाजीपाला महागणार- मंगळवारी जिल्ह्यात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका ६ हजार हेक्टरमधील भाजीपाला पिकाला बसला. पाऊस आणि गारपिटीमुळे वांगी, टोमॅटो, कोबी, मिरची, कारले, ढेंमस या भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. आधीच कडाडलेले भाजीपाल्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
खरेदी केंद्रावरील धान भिजले - जिल्ह्यात सध्या जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या शासकीय धान खरेदी केंद्रावरून धानाची खरेदी सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी धान विक्रीसाठी केंद्रावर आणत आहे. धानाचा काटा होईपर्यंत धानाची जबाबदारी ही शेतकऱ्यांची असते. मंगळवारी धान खरेदी केंद्रावर धान विक्रीसाठी आणलेल्या शेकडो क्विंटल धानाला अवकाळी पावसाचा फटका बसला. धान भिजल्याने ते पाखड होण्याची शक्यता असून, पाखड धान कोण खरेदी करणार, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
नुकसान चार आकडी, मदत मिळणार किती आकडी- गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण कृषी आणि महसूल विभागाच्या यंत्रणेने बुधवारपासून सुरू केले. रब्बीची २३ हजार हेक्टरवर लागवड असून, यातील सहा ते सात हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. भाजीपाल्यासह तूर आणि गव्हाचेसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानाचा आकडा जरी चार आकडी असला तरी शासनाकडून मदत किती आकड्यात जाहीर होते, हे देखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तीन तालुक्यांना सर्वाधिक फटका - मंगळवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा सर्वाधिक फटका गोंदिया, गोरेगाव, तिरोडा आणि सडक अर्जुनी या तालुक्यांना बसला आहे. जवळपास तासभर झालेल्या पावसाने बांध्यामध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. तर तूर, लाखोळी, गहू, हरभरा या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती आहे.
खरिपापाठोपाठ रब्बीतही तोटाच- खरिपात झालेले नुकसान रबीत भरुन काढू, या अपेक्षेने बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतीत विविध पिकांची लागवड केली; पण अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे त्यावर शेतकऱ्यांना पाणी फेरावे लागले आहे. त्यामुळे खरिपापाठोपाठ रबीतही तोटा झाल्याने शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. निसर्गाची मार आताही शेतकऱ्यांनी पडली असून ते चिंतेत अडकले आहेत.