केशोरी : कोरोनाच्या संकटासोबतच शेतकरी वर्गाला अस्मनी संकटाचा सामना करावा लागत आहे. आठवड्याभरापासून निसर्गाचे दुष्टचक्र सुरू आहे. तुफान वादळवारा व गारपिटीसह पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारी रात्री साडेसातच्या दरम्यान सुसाट वाऱ्यासह गारपिटीने धानपीक मातीमोल झाले. यात हातातोंडाशी आलेले पिकांचे नुकसान झाले.
उन्हाळी धानाचा हंगाम अंतिम टप्प्यात आलेला आहे. काही शेतात कापणी, मळणी सुरू झालेली आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकाला निसर्गाच्या दुष्टचक्राने लक्ष्य केले आहे. चार महिन्याच्या मेहनतीनंतर हातात आलेले पीक मातीमोल झालेले पाहून शेतकरी गहिवरला आहे. जवळपास असणाऱ्या गावांना गारपिटीचा तडाका बसला आहे. कच्चा घरांचे नुकसानसुद्धा झालेले आहे. शेतकरी वर्ग आधीच कोरोनाच्या संकटाने आर्थिक विवंचनेत असताना दुष्ट निसर्गाने सुद्धा गारपिटीचा तडाखा देत आणखीनच संकटात टाकलेले आहे.
उनपावसाचा खेळ सुरु असल्याने उभ्या असलेल्या धानाच्या लोंबीचे दाणे आपोआपच कापणी बांधणीच्या वेळी मातीत झडतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला जात आहे.