लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : तालुक्यातील बोंडगावदेवी, अर्जुनी मोरगाव व नवेगावबांध या परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर विजांच्या कडकडाटासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे कडधान्य भाजीपाला पीक व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावर्षी येत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.शुक्र वारी मध्यरात्रीनंतर तालुक्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक पर्जन्यवृष्टी अर्जुनी मोरगाव महसूल मंडळात ४३.२ मि.मी.झाली. त्याखालोखाल बोंडगावदेवी येथे २८ मि.मी.तर नवेगावबांध महसूल मंडळात १२ मि.मी.पर्जन्यवृष्टी झाली. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सध्या हरभरा पीक परिपक्व होऊन निघण्याच्या स्थितीत आहे. मात्र या पावसामुळे हरभरा पिकाचे नुकसान झाले आहे. तालुक्याच्या काही भागात भाजीपाला शेती केली जाते.नवेगाव मंडळातील सावरटोला गावचे शेतकरी किशोर तरोणे यांच्या शेतातील भाजीपाला पिकाचे नुकसान झाले आहे. त्यांच्या शेतात पाणी साचलेले आहे. सध्या मिरचीचे पहिले पीक निघाले आहे. दुसरे पीक निघण्याच्या स्थितीत असताना झालेल्या अवकाळी पावसामुळे मिरची काळी पडण्याची चिन्ह दिसून येत आहेत. शुक्र वारी झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याची कबुली तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम यांनी दिली. अद्याप नुकसानीचे क्षेत्र ठरले नसले तरी पंचनामे करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या अवकाळी पावसाचा टरबूज पिकालाही धोका असल्याचे सांगितले जाते.सध्या पावसाचा हंगाम नाही मात्र यावर्षी पावसाळा संपल्यानंतरही आजतागायत अवकाळी पावसाचे थैमान सुरूच आहे. कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाने शेतकरी पुरता हवालदिल झाल्याचे चित्र आहे. सततचे ढगाळ वातावरण असल्याने ऊन्ह पडत नाही त्यामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येते. अजूनही अवकाळी पावसाचे संकट टळले नाही. या आठवड्यात शनिवार, मंगळवार व बुधवारला जिल्ह्यातील काही गावात पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तिवली आहे.यापूर्वीसुद्धा नोव्हेंबर महिन्यात धानपीक तोडणी झाल्यानंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यावेळी धान पिकाचे मोठे नुकसान झाले होते. आ. मनोहर चंद्रिकापुरे व जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी भिवखिडकी परिसरात भेट देऊन पिकांची पाहणी केली होती. त्या दरम्यानच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात आली. शेतकºयांना आसमानी व सुलतानी संकटाचाही सामना शेतकऱ्यांना करावा लागत असल्याचे चित्र बघावयास मिळते. आॅगस्ट व सप्टेंबर २०१९ या महिन्यात अतिवृष्टी झाली होती. नाल्याच्या काठावर असलेल्या शेतकऱ्यांना या पुराचा फटका बसला. त्यामुळे जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, गोंदिया व तिरोडा तालुक्यात सुमारे अडीच हजार हेक्टर शेत जमिनीतील धान पिकाचे नुकसान झाले होते. या नुकसानीचे सर्वे, पंचनामे करण्यात आले.अहवाल जिल्हा मुख्यालयाला पाठविण्यात आला. त्यानंतर नागपूर विभागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने ६९ कोटी रुपयांची भरीव मदत मंजूर केली. मात्र यात गोंदिया जिल्ह्याला वगळण्यात आले. नेमक्या याच कालावधीत गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांचेही नुकसान झाले असताना का वगळण्यात आले.याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. मात्र अलीकडे वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह होणाऱ्या अवकाळी पावसामुळे विवाह समारंभावरही संकट उद्भवल्याचे दिसून येत आहे.पुन्हा वादळी पावसाचा इशाराहवामान विभागाने जिल्ह्यात सोमवार आणि मंगळवारी अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना रब्बी हंगामाला मुकावे लागण्याची शक्यता असल्याने त्यांच्यात चिंतेचे वातावरण आहे.
गारपिटीने शेतकरी हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 6:00 AM
शुक्र वारी मध्यरात्रीनंतर तालुक्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक पर्जन्यवृष्टी अर्जुनी मोरगाव महसूल मंडळात ४३.२ मि.मी.झाली. त्याखालोखाल बोंडगावदेवी येथे २८ मि.मी.तर नवेगावबांध महसूल मंडळात १२ मि.मी.पर्जन्यवृष्टी झाली. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सध्या हरभरा पीक परिपक्व होऊन निघण्याच्या स्थितीत आहे.
ठळक मुद्देविजांचा कडकडाट व पर्जन्यवृष्टी । रबी पीक भुईसपाट