दुचाकी-चारचाकी वाहनांची रेलचेल : दोन हजार पर्यटकांची एकाच दिवशी भेट सालेकसा : दरवर्षी आॅगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा दिवस फ्रेंडशिप डे ‘मैत्री दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून फ्रेंडशिप डे साजरा करण्यासाठी दिवसभरात दोन हजार ०७० पर्यटक हाजराफॉलला येऊन गेले. दिवसभरात सुमारे ३०० चार चाकी आणि दुचाकी वाहनांची रेलचेल राहिली. प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात हाजराफॉल या स्थळाला पर्यटकांची गर्दी राहिली. आतापर्यंत जिल्ह्यातील कोणत्याही नैसर्गिक स्थळाला एकाच दिवशी एवढ्या पर्यटकांनी भेट दिली नाही. यंदा ७ आॅगस्ट ही तारीख रविवारी आली. रविवारचा सुटीचा दिवस त्याचबरोबर यंदा याच दिवशी नागपंचमीसुध्दा आली. त्यामुळे काहींनी नागपंचमी साजरी केली तर काहींनी रविवार सुट्टीच्या दिवशी आठवड्याची कामे उरकण्यात घालवली. बहुसंख्य लोकांनी सोशल मीडियावर आपला मैत्री दिवस साजरा करीत शुभेच्छा दिल्या. परंतु युवावर्गाने आपला फ्रेंडशिप डे हाजराफाल परिसरात साजरा करण्याल्या प्रथम पसंती दिली. दुपारपासून पर्यटकांच्या स्वरूपात युवक-युवत्या, युगल जोडपे, पती-पत्नी हाजराफालला हजेरी देऊ लागले. सायंकाळपर्यंत २ हजार ०७० लोकांनी प्रवेशदारावर आपली नोंदणी करून घेतली होती. तसेच ३०० वाहनेसुध्दा प्रवेश करून गेली. फ्रेंडशिप डे निमित्त हाजराफाल धबधबाचा आनंद घेत विविध खेळांचासुध्दा आनंद पर्यटकांनी घेतला. या परिसरात सर्वच रोमांचित झालेले दिसून आले. (तालुका प्रतिनिधी) युवकांच्या देखरेखीत सर्व व्यवस्था हाजराफॉल हे नैसर्गिक पर्यटन स्थळ असून येथे भरपूर मनोरंजन व मनाला स्फूर्ती देणारे वातावरण लाभते. परंतु पर्यटक जेव्हा बेलगाम होतात तेव्हा त्याच्या जीवावर बेतल्याशिवाय राहत नाही. असे अनेक प्रकार हाजराफाल परिसरात घडले. परंतु संयुक्त वन व्यवस्थापन समिती नवाटोला येथील युवक आणि वनविभागातील सजग अधिकारी आणि कर्मचारी यांच्या विशेष देखरेखीत मागील दोन वर्षापासून अपघातावर नियंत्रण आले, असून गैरप्रकारावर आळा बसला आहे. समितीतील २६ मुले आणि २४ मुली या ठिकाणी सेवा देत आहेत. त्यामुळे कितीही संख्येत पर्यटक आले तरी प्रत्येकावर नजर ठेवली जाते. तसेच त्यांना आपल्या पध्दतीने आनंद घेण्यासाठी संपूर्ण परिसरात मोकळे ठेवण्यात येते. प्रवेशद्वारापासून रस्त्यावर पार्किंगच्या ठिकाणी, खेळांच्या ठिकाणी, पहाडावर, दरी डोंगर आदी सर्वत्र स्वयंसेवक मार्गदर्शन करतात.
हाजराफॉलला ‘फ्रेन्डशिप’चा जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2016 12:23 AM