नरेश रहिलेलोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : नक्षलवाद्यांचे रेस्टझोन म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात पोलीस जवान नक्षलवाद्यांचा कुटील डाव वेळीच हाणून पाडत आहेत. परंतु त्याच पोलिसांना त्यांच्या हक्काचा पगार देण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय मागे पडत आहे. आदेश न काढताच जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी लढा देणाऱ्या तब्बल ९२ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणी व दीडपट वेतनापासून वंचित ठेवले आहे. एप्रिल २०२१ पासून आजपर्यंत गोंदिया जिल्ह्यात श्वान पथक, बीडीडीएस पथक, एटीसी, जेटीएससी, व नक्षल सेल अंतर्गत प्रपाेगंडा सेल, इंटरसेप्शनसेल, नक्षल ऑपरेशन सेल, इंटरसेल, टेकसेल यांचे दीडपट वेतन बंद करण्यात आले आहे. त्याबाबतचे कोणतेही आदेश पोलीस अधीक्षक कार्यालयाने काढलेले नाहीत. मागील एक वर्षापासून या शाखांमध्ये काम करणारे ९२ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना शासन निर्णयानुसार एकस्तरपदाचे सुद्धा वेतन देण्यात आले नाही. या पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकांच्या उदासीनतेमुळे व कामचुकापणामुळे ९२ कर्मचारी, अधिकारी व त्यांच्या कुटुंबांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकाराकडे पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व स्वत:ला लोकसेवक म्हणविणाऱ्या लोकप्रतिनधींनी लक्ष घालण्याची गरज आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांची हालत झाली असून आता त्यांच्याकडे या निर्णयाच्या विरोधात दाद मागण्यासाठी मॅट कोर्टात जाण्यासाठीदेखील पैसे नाहीत.
इतर विभागांना एकस्तर मग पोलिसांना का नाही?-गोंदिया जिल्ह्यात विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांना एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ देण्यात येतो. परंतु गोंदिया जिल्ह्यातील पोलिसांना एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ का देण्यात येत नाही. जिल्हा परिषद, महसूल, वनविभाग, पाटबंधारे, उपप्रादेशिक परिवहन विभाग, आरोग्य विभाग यांना एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ देण्यात येतो. परंतु गोंदिया जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी लढा देणाऱ्या ९२ पोलिसांना मागील वर्षभरापासून हा लाभ देण्यात येत नाही.तर निलंबन किंवा ट्रान्सफरची धमकी-नक्षल विरोधी अभियानात काम करणाऱ्या त्या ९२ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना मागील १ वर्षापासून दीडपट वेतन किंवा एकस्तर वेतनश्रेणी पोलीस अधीक्षक कार्यालयाने आदेश न काढता बंद केले आहे. यासंदर्भात कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकारी यांना वेतनाबाबत विचारणा केली तर त्यांना मुरकुटडोहला पाठविण्यात येईल किंवा निलंबित करण्यात करण्यात येईल असे ठणकावले जात असल्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी नाव न लिहिण्याच्या अटीवर लोकमतला सांगितले.