गोंदिया : बहुतांश लोकांचा बँकेचा व्यवहार आता ऑनलाईन झाला आहे. बँकेत न जाताच पैसे ट्रान्सफर केले जातात; परंतु ऑनलाईनच्या नादात अनेकांना गंडाही बसत आहे. अनेक भामट्यांकडून लोकांना गंडविण्याचे काम केले जात आहे. आता केवायसीच्या नावाखाली फसवणूक केली जात आहे.
सर्वसामान्य लोकांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वच लोकच ॲन्ड्राॅईड मोबाईल वापरत आहेत. या ॲन्ड्राॅईड मोबाईलमधून बँकेचा व्यवहारही केला जातो. बँक खात्याशी फोन नंबर लिंक राहत असल्याने क्षणार्धात हे व्यवहार केले जातात. देशात नोटबंदीपासून कॅशलेस व्यवहार करा, असे आवाहन करण्यात आले होते. कोरोनाच्या काळातही पैसा हातात घेणे धोक्याचे असल्याने कॅशलेस व्यवहार करण्यात आला. ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी खाते क्रमांकाला केवायसी करणे गरजेचे असताना केवायसी करण्याच्या नावावरच अनेकांना लुटण्यात आले. बँकेचा खाते क्रमांक व एटीएम कार्डचा क्रमांक मागवून मोबाईलवर आलेली ओटीपी मागवून लोकांची फसवणूक केली जाते. पुरुषांपेक्षा महिला भामट्यांच्या आमिषला बळी पडत आहेत.
..................
गेलेला पैसा परत मिळणे कठीण
ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. एकदा ऑनलाईनच्या माध्यमातून पळविण्यात आलेला पैसा परत मिळणे कठीण आहे. ऑनलाईन फसवणूक करणारे लोक नवनवीन युक्ती शोधून फसवणूक करीत आहेत.
...................
अशी होऊ शकते फसवणूक
१) राष्ट्रीय बँकेचे नाव घेऊन फोन आला. आपल्या खात्यातून आपण व्यवहार करीत आहात; परंतु आपले खाते केवायसी केलेले नाही. आपण मोबाईलवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिलीत तर तुमचे खाते मी आताच सिस्टमवरून ऑनलाईन करून देतो असे सांगून त्यांना विविध माहिती विचारली. माहिती दिल्यावर त्यांच्या खात्यातून १४०० रुपये ट्रान्सफर झाल्याचा मॅसेज आला. त्या खात्यात असलेले संपूर्ण पैसे वळती करण्यात आले.
...
२) एका व्यापाऱ्याचा फोन वाजला. कामाच्या व्यस्ततेत असताना त्यांनी एकदा फाेन उचलला; परंतु मला काम आहे नंतर बोला असे सांगून टाळले. पुन्हा काही वेळात फोन आल्यावर त्या व्यापाऱ्याने संवाद साधला; परंतु इतका मोठा पैशांचा व्यवहार करताना त्यांनी खात्याला केवायसी केले नाही, असे सांगण्यात आले. थोडीच माहिती दिल्यास मी आपल्याला बँकेची उत्तम सेवा देण्यासाठी केवायसी करून देतो असे सांगून माहिती घेतली आणि व्यापाऱ्याला लाखोला गंडविले.
....
३) स्वयंपाकाच्या घाईगडबडीत असलेल्या एका गृहिणीला फोन आला. आपल्या खात्याला मोबाईल अपडेट नाही. मोबाईलला अपडेट कोणता नंबर करायचा. त्यांनी नंबर सांगितल्यावर केवायसी अपडेट नाही. माहिती दिल्यास त्वरित केवायसी करून देतो असे सांगून माहिती घेत त्यांच्या खात्यातील रक्कम काढून घेण्यात आली. नाईलाजास्तव त्यांना पोलीस ठाणे गाठावे लागले.