लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील गणेशनगरातील गौरव प्रकाश उपाध्ये यांच्या हनुमंत अॅग्रो नावाच्या कंपनीत पार्टनर म्हणून काम करणाऱ्या लोकांनी कंपनीची एक कोटी ८५ लाखांनी फसवणूक केली. फेबु्रवारी ते मार्च २०१७ या दरम्यानच्या या प्रकरणात पंजाब नॅशनल बँकेच्या व्यवस्थापकासह ३२ जणांवर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरव उपाध्ये यांनी शहर पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ते हनुमंत अॅग्रो नावाची कंपनीद्वारे धानापासून तांदूळ तयार करुन देण्याचे काम करतात. आरोपी विशाल खटवानी याचे वडील त्यांच्या वडिलांचे मित्र असून त्यांचे घरगुती संबंध होते. हनुमंत अॅग्रो कंपनीच्या कामात विशाल त्यांना मदत करीत होता. विशाल यांच्या कुटुंबियांची तांदळाची मिल असून त्याद्वारे गौरव हनुमंत अॅग्रोचे काम करीत होते. विशाल खटवानी हा गौरव यांचा लहानपणापासूनच मित्र आहे. अमर चिमानी हा विशाल खटवानी याचा आतेभाऊ आहे. विशाल व त्यांच्या कुटुंबियांच्या निरनिराळ्या नावाने कंपन्या असून त्याद्वारे ते तांदळाचा व्यापार करतात. गौरव यांनी सन २०१५ मध्ये हनुमंत अॅग्रो कंपनी उघडली असता विशालने त्यांना पंजाब नॅशनल बॅकेमध्ये खाते उघडून व्यापाराकरिता त्यांची संपत्ती गहाण ठेवली व एक कोटींची सीसी लिमीट मंजूर करवून दिली. तसेच तीन कोटींची बॅकेची गरंटी मंजूर करवून दिली. गौैरव हे विशाल खटवानीवर विश्वास करीत होते व त्यामुळे विशालच्या सांगण्यानुसार त्यांनी व्यापाराकरिता आपल्या सीसी खात्यातील एक कोटी रुपए विशालच्या खात्यामध्ये आरटीजीएसद्वारे वळती केले. त्यानंतर सन २०१७ मध्ये विशालने व्यापारात गौरव यांच्या ३ कोटी रूपयांच्या बँक गॅरंटीसाठी दुरुपयोग केल्याचे गौरव यांना समजले. यावेळी गोंदिया शहर पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार केली. यावेळी गौरवची बँक गॅरंटी त्याच्या खात्यामध्ये परत आली. परंतु विशाल याला सीसी मधील वळते केलेल्या पैशांबाबत विचारणा केली असता पैसे देणार नसल्याचे तो म्हणाला. त्याच्या घरातील वडिलधारी लोकांशी चर्चा करुन पैसे मिळतील म्हणून त्याबाबत तक्रार दिली नाही.गौरवच्या वडिलांची प्रकृती बरी नव्हती म्हणून ते त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष देऊ लागल्याने या प्रकरणाकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. साधारण आॅक्टोबर २०१८ मध्ये गौरव यांना सीसी (कॅश क्रेडीट) मधील पैसे भरण्याबबात नोटीस मिळाली व त्यांनी बँकेत जावून चौकशी केली असता त्यांची सीसी लिमीट कमी झाल्याचे समजले. त्यानंतर गौरव यांनी पंजाब नॅशनल बँकेच्या वरिष्ठ कार्यालयात जावून विचारणा केली असता कोणतीही माहिती त्यांना मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी पंजाब बॅकमध्ये जावून आपल्या चालू खात्याबाबत माहिती घेतली. त्यांच्या खात्यातून विशाल खटवानी व त्याच्यासोबत जोडलेल्या यादीतील कुटुंबियांच्या खात्यांवर पैसे गेल्याचे दिसून आले. त्यामुळे गौरव यांनी याबाबत विचारणा केली. बँकेकडून मिळालेल्या धनादेशाच्या प्रति दिल्या नंतर गौरवच्या खोट्या सह्या करुन धनादेश वटविल्याचे दिसून आले. गौरवच्या खात्यातून गेलेल्या रकमा मोठ्या असूनही बँक व्यवस्थापक कलमचंद गोयल यांनी गौरव यांना फोनद्वारे विचारणाही केली नाही. त्यामुळे गौरव यांना त्यांच्या खात्यातून गेलेल्या पैशांबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. आरोपींमध्ये यांचा समावेशया प्रकरणात गौरव यांच्या तक्रारीवरून विशाल खटवानी, भगवानदास इदनदास खटवानी, लक्ष्मीदेवी भगवानदास खटवानी, तुलसीदास भगवानदास खटवानी, कविता भगवानदास खटवानी, रेखा भगवानदास खटवानी, लता भगवानदास खटवानी, निर्मला भगवानदास खटवानी, सुशीलादेवी सच्चानंद खटवानी, रुपा सच्चानंद खटवानी, अमरलाल चिमनानी, ईश्वर चिमनानी, राखी चिमनानी, सुजनता चिमनानी, लक्ष्मी चिमनानी, हरिओम ट्रेडर्सचे मालक, विशाल अ?ॅग्रोचे मालक, ओम अग्रोचे मालक, गणेश फुड ग्रेन्सचे मालक, केके सिड्स प्रा.लि.चे मालक, रिकी डोंगरे, जिवन पारधी, सखाराम वैद्य, हुसनैरा, देवेंद्र तावाडे, बजिदुद्दीन, गणेश गौतम, लक्ष्मीचंद पालांदूरकर, रमेश ठाकुर, रमेश मेश्राम, नरेश नागपुरे, पंजाब नॅशलन बँक व्यवस्थापक कमलचंद गोयल व पंजाब नॅशनल बँकचे संबंधित अधिकारी यांच्या विरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
गोंदियातील हनुमंत अॅग्रो कंपनीची १.८५ कोेटींनी फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 6:19 PM
येथील गणेशनगरातील गौरव प्रकाश उपाध्ये यांच्या हनुमंत अॅग्रो नावाच्या कंपनीत पार्टनर म्हणून काम करणाऱ्या लोकांनी कंपनीची एक कोटी ८५ लाखांनी फसवणूक केली आहे.
ठळक मुद्दे३२ जणांवर गुन्हा दाखल पंजाब नॅशनल बँकेच्या व्यवस्थापकही संशयात