सखी मंचचे आयोजन : सुरेखा पुणेकरांच्या खळ्या आवाजाने खिळविले प्रेक्षक गोंदिया : सांस्कृतिक वैभवापासून बऱ्याच दूर असलेल्या गोंदियावातील रसिक प्रेक्षकांना अस्सल मराठमोळ्या लावण्यांनी मेजवाणी लोकमत सखी मंचच्या यावर्षीच्या पहिल्यावहिल्या कार्यक्रमाने दिली आणि तमाम सखींसह त्यांचे कुटुंबियही तृप्त झाले. निमित्त होते महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या ‘नटरंगी नार’ या कार्यक्रमाचे. लोकमत सखी मंचचे यावर्षी (२०१७) सदस्य होणाऱ्या तमाम सखी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी खास या कार्यक्रमाचे आयोजन नि:शुल्कपणे केले होते. मोठ्या शहरांमध्ये ज्या ज्येष्ठ लावणी सम्राज्ञीची एक झलक पाहण्यासाठी लोक तिकटी काढून जातात त्यांचा कार्यक्रम सखी सदस्यांना व त्यांच्या कुटुंबियांना अगदी नि:शुल्क पाहण्याचा आनंद घेता आला. सुरेखा पुणेकर आणि त्यांच्या संचातील मुलींनी एकापेक्षा एक ठसकेबाज लावण्यांवर नृत्य सादर करून गोंदियातील रसिकांना अंतर्मनातून नाचायला लावले. धकाधकीच्या जीवनशैलीतील हा अडीच तासांचा विरंगुळा गोंदियावासीयांना नवीन ऊर्जा देऊन गेला. गेली ३०-४० वर्षे संपूर्ण महाराष्ट्रावर अधिराज्य गाजविणाऱ्या सुरेखा पुणेकरांनी लावणी कशी आहे, हे पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच होती. मात्र वाढता वयातही आपल्या अभियनसंपन्न नृत्याने आणि कडक पण तेवढ्याच माधुर्याने भरलेल्या आवाजाने सुरेखा पुणेकरांनी गोंदियावासीयांना घायाळ केले. काही नृत्यांवर वन्स मोर झाला. विशेष म्हणजे यावेळी प्रेक्षक सखींनीही ‘झिंगाट’वर नृत्य सादर करून मनमुराद आनंद लुटला. भवभुती रंगमंदिरात रविवारच्या सायंकाळी भरगच्च भरलेल्या सभागृहात दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र क्लॉथ सेंटरचे संचालक हितेश अग्रवाल, प्रा.विमल असाटी आणि ए.टी.ज्वेलर्सचे संचालक पंकज चोपडा या पाहुण्यांसह लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी मनोज ताजने, जिल्हा कार्यालय प्रमुख मिलिंद वाढई, इव्हेंट संयोजक श्रीकांत पिल्लेवार, दिव्या भगत, जाहीरात प्रतिनिधी अतुल कडू आदी प्रामुख्याने उपस्थित होते. पाहुण्यांना लोकमतच्या अशा कार्यक्रमाला सदैव सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन इव्हेंट संयोजिका दिव्या भगत यांनी केले. कार्यक्रमासाठी वरुण खंगार, योगेश चौधरी, संतोष बिलोने व अनेकांनी सहकार्य केले.(जिल्हा प्रतिनिधी)
ठसकेबाज लावण्यांवर बेधुंद झाले सखी कुटुंबीय
By admin | Published: March 02, 2017 12:11 AM