लोकमत न्यूज नेटवर्कसौंदड: येथील रेल्वे स्थानक गोंदिया-बल्लारशाह रेल्वे मार्गावर असून, येथेच मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक- ६ आहे. मागील २ वर्षांपासून कोरोना महामारीमुळे या रेल्वे मार्गावरील सर्व रेल्वेगाड्या बंद करण्यात आल्या होत्या. २०२० मध्ये जुलै व ऑगस्ट महिन्यात सुपरफास्ट रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या असून, येथील रेल्वे स्थानकावरून साप्ताहिक सुपरफास्ट दरभंगा, बिलासपूर, चेन्नई, यशवंतपूर या गाड्या सुरू आहेत. गोंदिया-बल्लारशाहदरम्यान सौंदड, मोरगाव अर्जुनी, वडसा, नागभीड, मूल येथे सुपरफास्ट रेल्वे गाड्यांचा थांबा असूनसुद्धा मागील २ वर्षांत या सर्व ठिकाणांचा थांबा बंद करण्यात आला आहे. एकंदर कोरोनाच्या नावाखाली गाड्यांना सुपरफास्ट करून सर्वसाधारण प्रवाशांना मात्र त्रास दिला जात आहे. २ वर्षांनंतर गोंदिया-चंद्रपूर-बल्लारशाह ही पॅसेंजर रेल्वेगाडी २०२१ मध्ये ऑक्टोबर महिन्यात सुरू करण्यात आली. तीपण १५ सप्टेंबर २०२१ रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने येथील रेल्वे स्थानकावर आंदोलन केल्यानंतर २९ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली. ही गाडी गोंदियावरून सकाळी ७.३० सुटून बल्लारशाहवरून रात्री गोंदिया येथे ८.३० वाजता पोहोचते. या एकाच गाडीमुळे लहान व्यापारी, साधारण कर्मचारी व जनसामान्य जनतेला काहीच उपयोग होत नाही. यापूर्वी गोंदिया-बल्लारशाह गाडी ७ वाजता गोंदियावरून सुटून १० वाजता कंटगी-बल्लारशाह येथे जात होती. तसेच वडसा-बल्लारशाह-गोंदिया १२ वाजता गोंदियाला पोहोचत होती. चंद्रपूर-गोंदिया गाडी ३ वाजता गोंदियाला जात होती आणि गोंदिया-चंद्रपूर गाडी गोंदियावरून ५ वाजता सुटत होती. गोंदिया-वडसा गाडी सायंकाळी ७ वाजता गोंदियावरून सुटून चंद्रपूरवरून गोंदियाला रात्री ८.३० वाजता व ११.३० वाजता बल्लारशाह-कंटगी गाडी गोंदियाला पोहोचत होती. अशाप्रकारे दररोज ७ पॅसेंजर गाड्या ये-जा करत होत्या. पण पूर्व विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांतील ३०० किमी. अंतरावर एकच पॅसेंजर गाडी चालवून तिन्ही जिल्ह्यांतील सर्वसामान्य जनता व व्यापाऱ्यांवर अन्याय केला जात आहे.केंद्रात भाजपाची सरकार असून, महाराष्ट्रला रेल्वे राज्यमंत्री पद देऊनही व राज्यात महाविकास आघाडीची सरकार असून तिन्ही पक्षांचे आमदार, खासदार असून, सर्वसामान्य नागरिकांच्या रेल्वेच्या समस्यांचे निवारण करू शकत नाही आणि ज्या पक्षाचा महाराष्ट्रात एकही आमदार, खासदार नाही, त्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाने १५ सप्टेंबर २०२१ रोजी लाभ सौंदब रेल्वे स्थानकावर आंदोलन करून दिवसांतून सात पॅसेंजर गाड्या चालणाऱ्या गाड्यांपैकी एक रेल्वे गाडी सुरू केली.
लोकप्रतिनिधी गप्प बसून
- महाराष्ट्राला लागून मध्यप्रदेश राज्यात जाणाऱ्या गोंदियावरून गोंदिया, कंटगी, बालाघाट, नैनपूर या सर्व पॅसेंजर रेल्वे गाड्या आजघडीला पूर्वीप्रमाणे पूर्ववत सुरू आहेत. पण या तिन्ही जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी पूर्वीप्रमाणे पूर्ववत रेल्वे गाड्या सुरू करण्यासाठी गप्प का आहेत? असा प्रश्न आता जनता करीत आहे. पूर्व विदर्भातील तिन्ही जिल्ह्यांत ३ लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य व अनेक आमदार असुनसुद्धा झोपले आहेत काय? अशी सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चा आहे. तसेच रेल्वे सल्लागार समितीसुद्धा नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष न देता कागदावर व रेल्वे बोर्डावर नावापुरत्या आहेत का? असे नागरिक बोलत आहेत. रेल्वे राज्यमंत्री महाराष्ट्राचे असूनसुद्धा त्यांचे या समस्यांकडे व तिन्ही जिल्ह्यावर दुर्लक्ष केले जात असल्याचे समजते. तेथेच आता भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रतिनिधी वडसा येथे २१ फेब्रुवारी रेलरोको आंदोलन करणार आहेत.