लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील गुन्हेगारी मोठी समस्या बनलेली आहे. यातच महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही अधून-मधून घडत असतात. महिलांच्या बाबतीतील एकूण गुन्हे कमी झाले असले तरी अत्याचार व अपहरणाच्या गुन्ह्यांत वाढ झाल्याने चिंतेचे वातावरण आहे.
देशभरात अत्याचाराच्या घटनांनी संताप व्यक्त होत आहे. या व्यवस्थेत महिलांना सुरक्षितता मिळत नाही. यातूनच नराधमांची वाकडी नजर महिला, मुलींवर पडत असल्याचे चित्र आहे. समाजात विकृती वाढत असून, संस्कारक्षम पिढी घडविण्यात कुठे तरी आपण कमी पडतो, हे या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. गुन्हेगारांमध्ये कायद्याचा जरब निर्माण करणारी यंत्रणा कुचकामी ठरत आहे. सुरक्षित वातावरण देण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. हे होत नसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
खुनामध्ये लक्षणीय वाढ पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवायांचे सत्र राबविणे सुरू केले तरीही खुनांचे गुन्हे वाढतच आहेत. जानेवारी ते आतापर्यंत १७ खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यात ४२ आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
गुन्हेगार निर्धावत आहेत पोलिसांकडून महिला अत्याचार विरोधातील गुन्ह्यांचा तपास जलदगतीने होतो. यातील आरोपींना निष्पन्न करून त्यांच्या विरोधात अटकेची कारवाईही केली आहे. ही सकारात्मक बाब असली तरी यामुळे महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण झालेले नाही. महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे सातत्याने वाढत आहे. यावर प्रतिबंध ठेवण्यासाठी ठोस उपाययोजनांची आवश्यकता आहे.
कोण काय म्हणतंय.... "नारीशक्त्ती म्हणून स्त्रीचा गौरव केला जातो. दुसरीकडे मात्र तिच्यावर अत्याचार होतात. समाजातील विकृती दिवसेंदिवस वाढत आहे. पोलिसांचा वचक नाही. सत्ताधाऱ्यांचा यंत्रणेवर अंकुश नाही. महिलांना आर्थिक मदत देण्यापेक्षा त्यांची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे. लहान मुले, मुली, महिला सुरक्षित नाहीत."- ममता पाऊलझगडे, सामाजिक कार्यकर्ती, किडंगीपार
कौटुंबिक हिंसाचारात चार महिलांचा बळीसासरच्या मंडळींकडून विविध कारणाने छळ झाल्यामुळे विवाहित महिलेला आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागते. या गुन्ह्यात त्या विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून सासरच्या मंडळीविरोधात गुन्हे दाखल होतात. मागील वर्षी व यंदा सात महिन्यांच्या कालावधीत अशा प्रकारच्या आत्महत्येच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. कौटुंबिक हिंसाचार हा सुद्धा महिलांवरचा मोठा आघात होताना दिसत आहे.