गोंदिया : कौटुंबिक कारणातून पती अथवा त्याच्या कुटुंबीयांकडून पत्नीचा छळ होत असल्याचे अनेक प्रकार आजपर्यंत उघडकीस आले आहेत; परंतु कोरोनाच्या काळात पुरुषांचाही छळ झाल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. मागील दीड वर्षात जिल्ह्यातील १४ पुरुषांनी आपला पत्नीकडून छळ झाल्याची तक्रार भरोसा सेलकडे केली आहे. भरोसा सेलकडून अशा दाम्पत्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे. देशात कोरोनाचे संकट असताना या काळात कुटुंबे एकत्रित आली. लैंगिक समानता मानणाऱ्या देशांत केवळ स्त्रियांवरच कौटुंबिक अत्याचार होत असल्याचा अनेकांचा गैरसमज आहे; परंतु कोरोनाकाळात कौटुंबिक कलहाची झळ काही पुरुषांनाही बसली आहे.
.........................
आर्थिक टंचाई आणि अतिसहवास
कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे कुटुंबे एकत्रित आली. एकमेकांसोबत राहताना पती-पत्नीत खटके उडत होते. दीड वर्षापासून अशीच स्थिती असल्याने पती-पत्नीतील वाद चव्हाट्यावर आलेत. आर्थिक अडचण व पती-पत्नीचा अतिसहवास हे वादाचे कारण आहे.
........................
कोरोनाकाळात तक्रारी वाढल्या
कोरोनाच्या काळात एकत्र राहत असलेल्या दाम्पत्यांना अधिक वेळ मिळाल्याने त्या वेळात त्यांनी एकमेकांच्या खोड्या काढण्यात जास्त वेळ घालविला. त्यामुळे दोघांमध्ये भांडणे निर्माण झाली. परिणामी कोरोनाच्या काळात ते तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचले.
.........................
पुरुषांच्या हक्कासाठी कोण लढणार?
महिलांवर अत्याचार झाला तर पोलीस ठाणे, महिला सेल, महिला आयोग व बरीच यंत्रणा महिलांच्या मदतीला पुढे येते. परंतु पुरुषांवर अन्याय झाला तर पुरुषांच्या मदतीसाठी कोणतीच यंत्रणा उभी राहत नाही. मुकाट्याने छळ सहन करून आत्महत्येशिवाय त्याला पर्याय उरत नाही. असे होऊ नये याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
.....................
बायकोकडून छळ होत असल्याच्या तक्रारी
सन
२०१८-३
२०१९- ३
२०२०-१०
२०२१ (जुलै)-५
..........................
वादामुळे कुटुंब कसे उद्ध्वस्त होते याची जाणीव वाद करणाऱ्या दाम्पत्यांना करून दिली जाते. जीवनात घेतलेला चुकीचा निर्णय किंवा संशय आपले जीवन कसे उद्ध्वस्त करते; तसेच आपले वैवाहिक जीवन सुखी व शांततेत कसे जगावे, यासाठी भरोसा सेल समुपदेशन करतो.
- तेजस्विनी कदम, भरोसा सेलप्रमुख
..................