नरेश रहिले /लोकमत विशेष
गोंदिया : रेतीची तुटलेली पार्टनरशिप आणि रखडलेल्या आर्थिक व्यवहारामुळे शहरातील रिंगरोडवरील एका खासगी रुग्णालयाच्या परिसरात धारदार शस्त्राने वार करून रविप्रसाद राधेलाल बंभारे (३५, रा. लोधीटोला ) याचा गुरुवारी (दि. १४) रात्री निर्घृण खून करण्यात आला. हा खून करणारे आरोपी हे अट्टल गुन्हेगार आहेत. मागील सात वर्षांपासून ते गुन्हेगारी जगतात असून चौघांवरही गंभीर गुन्हे आहेत.
खून, खुनाचा प्रयत्न, दरोडे, शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ले, घातक हत्यार बाळगणे, गैरकायद्याची मंडळी जमवून हल्ला करणे, चोरी करणे, लुटणे, गंभीर दुखापत करणे, दरोडा घालण्याचे काम त्या आरोपींनी केले. त्या चार आरोपींवर गोंदिया जिल्हा पोलिसांच्या अभिलेखावर तब्बल ३२ गुन्हे दाखल असल्याची बाब पुढे आली आहे. गोंदियाच्या पोस्टमन चौक सरस्वती शाळेजवळ राहणारा आरोपी श्याम उर्फ पीटी रमेश चाचेरे (३२) याच्यावर १२ गुन्हे दाखल आहेत. त्यात चोरीचे तीन, अपहरणाचे दोन, शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ले केल्याचे दोन, अवैध दारू विक्रीचे तीन, गंभीर मारहाणीचा एक, तर घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी भारतीय हत्यार कायद्यान्वये एक गुन्हा असे १२ गुन्हे दाखल आहेत. गोंदियाच्या कुंभारटोली येथील दुसरा आरोपी प्रशांत उर्फ छोटा कालू मातादीन ज्ञानेश्वर भालेराव (३०) याच्यावर नऊ गुन्हे दाखल आहेत. त्यात खुनाचा एक गुन्हा, दरोड्याचा एक गुन्हा, विश्वासघात केल्याचा एक गुन्हा, लुटपाटचा एक गुन्हा, घातक हत्यार बाळगल्याप्रकरणी एक गुन्हा, तर गंभीर मारहाणीचे ४ गुन्हे दाखल आहेत. गोंदियाच्या गौशाला वॉर्डातील शुभम गोपाल चव्हाण उर्फ परदेशी (२९) याच्यावर ८ गुन्हे दाखल आहेत. त्यात चोरी, लुटणे, गंभीर दुखापत, गैरकायद्याची मंडळी जमवून मारहाण करून धमकी देणे व संशयास्पदरित्याही तो आढळला होता असे आठ गुन्हे दाखल आहेत. शाहरूख रज्जाक शेख (२३) रा. मदीना मस्जीद मागे गौतमनगर गोंदिया याच्यावर मारहाण, घातकशस्त्र बाळगणे व लुटणे असणे तीन गुन्हे दाखल आहेत. या चार आरोपींवर ३२ गुन्हे दाखल आहेत.
बॉक्स
श्याम म्हणतोय माझ्यावरील हल्ल्याचा बदला घेतला
लोधीटोला येथील रविप्रसाद बंभारे याचा तलवार, गुप्ती व चाकूने सपासप वार करून खून करण्यात आला. खून झाल्याच्यावेळी रेतीची पाटर्नरशिप तुटल्यामुळे खून झाल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली. परंतु या प्रकरणाचा गोंदिया पोलीस तपास करीत असतांना मृतकाने आपल्यावर हल्ला केला होता त्याचा बदला घेतला असे श्याम चाचेरे याने पोलिसांना सांगितल्याची माहिती पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी दिली.
गुन्हेगारी जगातात आपले नाव मोठे करणाऱ्यांचे मनसुबे हाणून पाडण्यासाठी गोंदिया पोलीस सक्षम आहे. गंभीर गुन्हे करून जिल्ह्यात गुन्हेगार मोकाट फिरू शकत नाही. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी आम्ही काम करीत आहोत. अशा गुन्हेगारांच्या विरोधात आणखी काही तक्रारी असतील तर पोलिसांना द्या.
विश्व पानसरे- पोलीस अधीक्षक गोंदिया