३.४५ लाखांचा भ्रष्टाचार : वरिष्ठ अधिकाऱ्यांना धमकी लोकमत न्यूज नेटवर्कपरसवाडा : देवरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या हरदोली ग्रामपंचायतचे ग्रामसेवक व्ही.एस. श्रीवास्तव यांनी १३ वा वित्त आयोग व पर्यावरण ग्राम समृद्धी योजना २०१४-१५ या कालावधीत मजुरांची बोगस नावे हजेरी पटावर व बोगस बिल, कोटेशन मंजूर दाखवून रक्कम हडपली. या प्रकरणात त्यांना निलंबित करण्यात आले आहे. यात देवरीचे खंडविकास अधिकारी यांनी चौकशी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांंना सोपविला. तसेच या गैरकारभाराची फेरचौकशी आमगावचे खंडविकास अधिकारी यांनी करून अहवाल सादर केला. यात . श्रीवास्तव यांना पत्र क्रमांक (२५१०, दि.११/०८/२०१६) अन्वये देवरीच्या गट विकास अधिकाऱ्यांनी १९ आॅगस्ट २०१६ ला उपस्थित राहण्याची सूचना दिली. पण सदर ग्रामसेवक अनुपस्थित राहिले. पुन्हा पत्र क्रमांक (५११, दि. १९/०८/२०१६) अन्वये गटविकास अधिकाऱ्यांनी प्रकरणाची कल्पना दिली व २३ आॅगस्ट २०१६ ला उपस्थित राहण्याची सूचना दिली. या दिवशी ते उपस्थित होते. पण तक्रारीसंबंधात दस्तावेजांची मागणी केल्यावर त्यांनी सन २०१४-१५ व १६-१७ च्या संपूर्ण फंडाचे दफ्तर नसल्याचे सांगितले. पण २९ आॅगस्ट २०१६ ला संपूर्ण दफ्तर जिल्हा परिषदेला आणून देण्याचे आश्वासन लेखी स्वरूपात दिले. पर्यावरण ग्राम समृद्धी योजनेच्या सन २०१४-१५ ची कॅशबुक निरीक्षणास सादर केली. त्यामुळे उपलब्ध दस्तावेजांच्या आधारे सहायक गट विकास अधिकारी पं.स. आमगाव यांनी चौकशी अहवाल सादर केला.यात हरदोली येथील १३ व्या वित्त आयोगांतर्गत श्रीमूर्ती स्टील फर्निचर ट्रेडर्स साखरीटोला यांना प्रदानाबाबतचे प्रमाणक क्र.३ ची १६ आॅगस्ट २०१४ ला ३२ हजार ४०० रूपयांची बॅटरी खरेदीची नोंद कॅशबुकला होती. पण तपासणीत पुरवठाधारकांनी देयकाचा दिनांक ३ सप्टेंबर २०१४ दर्शविला आहे. तसेच त्रिमूर्ती स्टील ट्रेडर्स यांचे प्रदानाबाबतचे प्रमाणक क्र.५ ची २२ डिसेंबर १४ अन्वये ३२ हजार ४०० रूपये कॅशबुकला नोंद आहे. बॅटरी खरेदीच्या प्रदानाबाबत १० जानेवारी २०१५ ला दर्शवून पुन्हा तीच रक्कम ३२ हजार ४०० व १७ मार्च २०१५ ला ५७ हजार ८४० रूपयांची नोंद असून प्रत्यक्ष देयकावर २७ मार्च २०१५ नमूद केले. त्यामुळे साहित्य व साहित्याचे देयक ग्रामपंचायतीला प्राप्त नसून रजिष्टरला नोंद नाही. यात नियमबाह्यपणे खर्च करण्यात आल्याचे निदर्शनास आले.२२ डिसेंबर २०१४ प्रमाणे, १३ वा वित्त आयोगाचे ७५ हजार रूपये शिवनाथ इंटरप्रायजेस गोंदियाकडून कचरापेटी खरेदी १४ मार्च २०१५ अन्वये ७५ हजारांची कॅशबुला नोंद आहे, पण साहित्य विल्हेवाट नोंद नाही. २३ आॅक्टोबर २०१५ ला सेल्फद्वारे धनादेश क्रमांकाने (५४४२४१) एक लाख ८३ हजार ६०० रूपये वठविले. पण नियमाप्रमाणे एक हजार रूपये किमतीचे साहित्य शोध व रेखांकित धनादेशाद्वारे साहित्य पुरवठाधारकांना देणे बंधनकारक आहे. याचा ग्रामसेवक श्रीवास्तव यांनी स्वत: अवलंब केला आहे. पर्यावरण ग्राम समृद्धी योजनेंतर्गत वृक्ष लागवडीकरिता खड्डे खोदकामाची मंजुरी २४ जून २०१४ ची आहे. यात धनादेश क्रमांक (०२४२९६) अन्वये ७२ हजार रूपयांची कॅशबुकला नोंद आहे. नमूना २२ च्या पाहणीदरम्यान १० जुलै २०१४ पर्यंत काम केल्याचे दिसून येते. परंतु कॅशबुक खर्च २४ जून २०१४ म्हणजे प्रत्यक्ष काम सुरू होण्याच्या १६ दिवसांपूर्वीच खर्च दाखवून काढून घेतले. यात सर्व हिशेबच चुकीचा दिल्या प्रकरणी ते नियमबाह्य असल्याचा ठराव घेण्यात आला. या प्रकरणाबाबत वरिष्ठ अधिकारी कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हरदोलीचे ग्रामसेवक निलंबित
By admin | Published: July 11, 2017 12:46 AM