केशोरी : स्थानिक ग्रामपंचायतीने केशोरी गावातील घंटागाडीसाठीच्या माध्यमातून जमा होणारा कचरा टाकण्यासाठी गाव तलावाच्या पाळीला लागून तार केलेल्या कचरा यार्डमधील प्लॉस्टिक पिशव्या आणि कोंबड्यांची पिसे रस्त्यावर येत असल्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. हे कचरा यार्ड हटवून इतर ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
केशोरी या गावाच्या प्रथमदर्शनी भागात असलेल्या गाव तलावाच्या पाळीला लागून असलेली खाली जागा ग्रामपंचायतीने गावाच्या सौंदर्यीकरणासाठी राखीव ठेवली आहे. त्या जागेमध्येच घंटागाडीच्या माध्यमातून जमा करण्यात येणारा गावातील कचरा टाकण्यासाठी खड्डा करून कचरा गार्ड तयार करण्यात आला आहे. या यार्डला लागूनच केशोरी-साकोली हा महत्त्वाचा जिल्हा मार्ग आहे. रात्रंदिवस या मार्गाने वाहने धावत असतात. त्याचबरोबर गावातील नागरिक सकाळ-संध्याकाळ फेरफटका मारण्यासाठी या रस्त्याच्या उपयोग करतात. खाली जागेचा उपयोग गावातील क्रीडा प्रेमी, विद्यार्थी क्रिकेट सराव करण्यासाठी कतात. या महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या कचरा यार्डमधील प्लॉस्टिक पिशव्या, कोंबड्यांची पिसे रस्त्यावर हवेच्या माध्यमातून पसरली जात आहेत. काही भाजी विक्रेते खराब झालेले टोमॅटो, वांगी यासह इतर साहित्य या कचरा यार्डमध्येच टाकत असल्यामुळे सडका वास येऊ लागला आहे. याप्रकरणी ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घेऊन कचरा यार्ड हटवून इतरत्र ठिकाणी गावापासून दूर असलेल्या जागेत कचऱ्यांची विल्हेवाट लावावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.