गोंदिया : छत्तीसगडच्या तरुणींना रेल्वेच्या नोकरीत लावून देण्याच्या नावावर मुलींना कोलकाता येथे घेऊन जात असताना मोहन नगर पोलिसांनी दुर्ग येथील रेल्वेस्टेशनवर आरोपी उत्तमचंद मोहन खांडेकर (५०) रा. तांडा ता. जि. गोंदिया याला अटक केली. तो सेवानिवृत्त फौजी गोंदिया जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार असून तो तडीपार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सन २०१३ मध्येही त्याला तडीपार करण्यात आले होते. तर सन २०२१ मध्ये गोंदियाच्या पोलीस अधीक्षकांनी पाच महिन्याकरीता त्याला तडीपार केले होते. त्याच्यावर गोंदिया शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचे तीन गुन्हे दाखल आहेत. गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात दंगे करविणे, शिवीगाळ करणे व दारूविक्री करणे असे १७ गुन्हे दाखल आहेत. तो मुलींची तस्करीही करीत होता असा संशय पोलिसांना आहे. दुर्ग जिल्ह्यात शासकीय नोकरी मिळवून देण्याच्या नावावर फसवणूक करणाऱ्या त्या आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्याविरुध्द मोहननगर पोलिसांनी भादंविच्या कलम ४२० अन्वये गुन्हा दखल केला आहे. या घटनेचे त्याचे धागेदोरे कुठकुठपर्यंत आहेत याचा शोध दुर्ग पोलीस घेत आहेत. त्यासाठी गोंदिया, नागपूर व कोलकाता या ठिकाणी माहिती काढत आहेत.