लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नवेगाव-नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पांतर्गत नागझिरा वन्यजीव अभयारण्यात ६० बारमाही वनमजूर वेगवेगळ्या संरक्षण कुटीवर कार्यरत आहे. या बारमाही वनमजुरांचे वेतन आठ महिन्यांपासून थकीत आहे. त्यामुळे या बारमाही वनमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान, हे वेतन येत्या दहा दिवसांत देण्यात यावे,अन्यथा वन्यजीव अभयारण्यातील प्रवेशद्वारावर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा बारमाही वनकामगार संघटनेने दिला आहे. यासंबंधिचे निवेदन वनपरिक्षेत्र अधिकारी नागझिरा वन्यजीव अभयारण्य साकोलीमार्फत उपवनसंरक्षकांना दिले आहे.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प राखीव क्षेत्रांतर्गत नागझिरा वन्यजीव अभयारण्यात ६० बारमाही वनमजूर वेगवेगळ्या संरक्षण कुटीवर काम करत आहे. नागझिरा वन्यजीव अभयारण्यातील बीट वनरक्षक यांच्यासोबत पायी फिरुन वनसंरक्षणाची कामे संरक्षण कुटीवर मुक्कामी राहून पार पाडत आहेत. रात्रदिवस वन्यजीव व वन रक्षणाचे काम करुनसुध्दा या बारमाही वनमजुरांचे आठ महिन्यांपासून वेतन थकीत आहे. मे २०२० पासून या बारमाही वनमजुरांनी केलेल्या कामाची मजुरी मिळाली नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीचीवेळ आली आहे.
दरम्यान, वनमजुरांचे थकीत वेतन दहा दिवसांत न मिळाल्यास नागझिरा वन्यजीव अभयारण्यातील प्रवेशद्वारावर उपोषणावर बसण्याचा इशारा देण्यात आला आहे. शिष्टमंडळात बारमाही वनकामगार संघटनेचे अध्यक्ष विलक्षण मडावी, संघटनेचे सदस्य असुराज श्यामकुंवर, सुरेश लांजेवार, हेमराज कंगाली, सुकराम चौधरी, मोरेश्वर खोब्रागडे, राधेश्याम वलथरे, फुलीचंद वाळवे, मनोहर टेकाम उपस्थित होते.