नवेगावबांध : जननायक बिरसा मुंडा बलिदान दिनानिमित्त पोलीस ठाणे नवेगावबांध आणि सशस्त्र नक्षल दूरक्षेत्र धाबे पवनी यांच्या संयुक्त विद्यमाने नवेगावबांध पोलीस ठाणे अंतर्गत जब्बारखेडा येथे गुरुवारी आरोग्य शिबिर घेण्यात आले.
नक्षलग्रस्त भागात नक्षल चळवळीला आळा बसविण्याच्या उद्देशाने अति दुर्गम नक्षलग्रस्त भागातील जनतेकरिता शासन सतत सहकार्य करीत असल्याची भावना निर्माण व्हावी, आदिवासी बांधवांचा विश्वास संपादन करता यावा याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जालंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली वीर बिरसा मुंडा बलिदान दिवसानिमित्त पोलीस ठाणे स्तरावर आरोग्य शिबिर घेण्यात येत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जब्बारखेडा येथे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या वेळी ठाणेदार जनार्धन हेगडकर, पोलीस पाटील अमर कोडापे, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, प्राथमिक शाळा जब्बारखेड्याचे शिक्षक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी वीर बिरसा मुंडा यांच्या यांच्या छायाचित्राला मार्ल्यापण करून अभिवादन केले. जब्बारखेडा, एरंडी दरे व परिसरातील ८० महिला, पुरुष, बालके यांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. नागरिकांची वैद्यकीय तपासणी करून गरजू रुग्णांना औषध, ग्लुकोजचे वाटप करण्यात आले. यावेळी नागरिकांची कोरोना चाचणीदेखील करण्यात आली. नवेगावबांधचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ए.एम. कुकडे, औषध निर्माता एस.टेंबरे, आरोग्य सेविका पी.झेड. पटले, ग्रामीण रुग्णालय नवेगावबांधचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भोयर, डॉ. पल्लवी नाकाडे, डॉ. आर.बी.पंचभाई, डॉ. आनंद पाटील, आरोग्य पर्यवेक्षिका एस.बी. आंबेडारे,आम्रपाली घरडे यांनी या शिबिरात सेवा दिली. पोलीस हवालदार इंद्रपाल कोडापे, साईनाथ नाकाडे, शिपाई दीपक कराड, विलास वाघाये, सयाम, सैनिक डोंगरवार, भूमके,मडावी, नक्षल सशस्त्र दूरक्षेत्र धाबेपवनी, पोलीस ठाणे नवेगावबांध येथील पोलीस कर्मचारी व आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी सहकार्य केले.
...............
७० कुटुंबांना पाणी शुध्दीकरण यंत्राचे वाटप
ग्राम वन समितीमार्फत वनरक्षक अमोल चौबे यांच्या उपस्थितीत जब्बारखेडा येथील नागरिकांना ७० पाणी शुद्धीकरण यंत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी कोरोना संदर्भात जनजागृती करण्यात आली.