केशोरी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे सत्र नियमित सुरू ठेवल्याने लसीकरणाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यामुळे आरोग्य केंद्राने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे विक्रमी प्रमाण गाठल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.पिंकू मंडल यांनी सांगितले.
येथील आरोग्य केंद्रांतर्गत राजोली, इळदा, परसटोला, चिचोली, वडेगाव (बंध्या) हे ५ आरोग्य उपकेंद्र असून, हे सर्व आरोग्य उपकेंद्र आदिवासी बहुल, दुर्गम, नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील क्षेत्रात मोडतात. या गावांच्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांसह पोलीस पाटलांच्या योग्य सहकार्याने लसीकरणाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. त्याचबरोबर, वैद्यकीय अधिकारी डॉ.मंडल व डॉ.कापगते यांच्या मार्गदर्शनात लसीकरण पथक प्रभारी राखी हाडगे यांच्या पथकाने नियमित लसीकरणाचे सत्र राबविले. परिणामी, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, कोरोना लसीकरण सत्राची माहिती आरोग्य विभागाकडून एक दिवसापूर्वीच प्रकाशित करण्यात येत असते.
त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी नागरिक योग्य वेळी उपस्थित होतात. लसीकरणामुळे कोरोनापासून संरक्षण होत असून, आरोग्यावर कोणताही वाईट परिणाम किंवा धोका नाही, असे नागरिकांना आता पटले आहे. यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या आरोग्य उपकेंद्र वडेगाव (बंध्या) येथे ९७ टक्के, परसटोला आरोग्य उपकेंद्र येथे ८८ टक्के, चिचोली आरोग्य उपकेंद्र येथे ९६ टक्के, इळदा आरोग्य उपकेंद्र येथे ६० टक्के, राजोली उपकेंद्र येथे ५५ टक्के, केशोरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ९६ टक्के असे विक्रमी प्रमाणात लसीकरण झाल्याचे डॉ.मंडल यांनी सांगितले, तर काही गावे १०० टक्के लसवंत होत असल्याची माहिती दिली आहे.
-------------------------------
लवकरात लवकर लसीकरण करा
प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत नागरिकांकडून लसीकरणाला उत्तम प्रतिसाद मिळत असून, लवकरच १०० टक्के लसीकरण होणार, असा विश्वास आहे. मात्र, कित्येक भागातील नागरिक आजही लस घेत नसल्याचे, तसेच दुसरा डोस टाळत असल्याचे दिसत आहे. असे न करता आपल्या व कुटुंबाच्या सुरक्षेसाठी लवकरात लवकर लसीकरण करा, असे डॉ.मंडळ यांनी कळविले आहे.