विजय मानकर
सालेकसा : कित्येक दिवस किंवा महिन्यापर्यंत कोणतेही आरोग्य कर्मचारी गावापर्यंत पोहोचत नाही आणि शासकीय आरोग्य सेवा सर्वसामान्य गोरगरीब माणसाच्या दारापर्यंत पोहोचत नाही. अशी तक्रार मागील काही वर्षांपूर्वी नेहमी येत असायची एवढेच नाही तर प्रसूती पूर्व अर्भकाचा मृत्यू, बालमृत्यू व मातामृत्यूचे प्रमाण ग्रामीण भागात खूपच जास्त होते. स्त्रियांना आपल्या आजारावर औषधोपचार करून घेण्यासाठी झोला छाप डाॅक्टरांच्या भरवशावर अवलंबून राहावे लागत होते. परंतु मागील काही वर्षांत तालुक्यात गावागावात आशा सेविकांनी अशी आरोग्य क्रांती घडवून आणली आहे.
आज गर्भवती महिलांची प्रसूती दवाखान्यातच होऊ लागली आहे. प्रसूती पूर्व नियमित चाचणी व औषधोपचार वेळेवर उपलब्ध होत असल्याने तसेच अचूक निदान व उपचार मिळत असल्याने मातामृत्यू, बालमृत्यू, अर्भक मृत्युदर फार कमी झाला आहे. सालेकसा तालुक्यात एकूण चार प्राथमिक आरोग्य केंद्र असून त्या अंतर्गत २२ उपकेंद्र आहे. यामध्ये एकूण ४४ आरोग्य सेविका कार्यरत आहेत. त्यांना प्रत्येक गावापर्यंत आणि गावातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचणे अशक्यच असते. अशात या ठिकाणी आशा सेविकांनी रुग्ण आणि सरकारी दवाखाना, कुटुंब आणि आरोग्य सेवा यातील अंतर कमी करण्याचे कार्य केले. एखाद्या महिलेची प्रसूतीची वेळ आली की त्यावेळी दिवस असो की रात्र सकाळ असो त्वरित धावून त्या महिलेला संस्थेत प्रसूतीसाठी कसे लवकरात लवकर यासाठी त्यांची धावपळ सुरू असते. एवढेच नाही तर रुग्णवाहिका बोलावणे, आरोग्यसेविका किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क करणे याबाबतीत नेहमी फ्रंट फुटवर असतात. त्यामुळे वेळेवर दवाखान्यात नेऊन प्रसूती सुखरूप करवून घेणे आधीपेक्षा फारच सोपे झाले आहे.
..........
आशांमुळे गावागावात पोहचली आरोग्य सेवा
गावागावात आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी आशा सेविकांच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरविण्याची योजना सर्वांत प्रभावी ठरली आहे. आरोग्य सेवेचा लाभ आता गावागावांतच नाही तर घराघरांपर्यंत २४ तास पोहोचत आहे. ९५ ते १०० टक्के प्रसूती दवाखान्यात सुरक्षित होत आहेत. तालुक्यात एकूण ८५ महसूल गावे असले तरी छोटी मोठी गावे मिळून एकूण १५२ गाव आहेत. या गावासाठी तालुक्यात एकूण १०६ आशा सेविका आहेत. त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र कावराबांध अंतर्गत २९, सातगाव अंतर्गत २४, बिजेपारअंतर्गत २१ आणि प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसा अंतर्गत ३२ आशा सेविका तत्परतेने कर्तव्य बजावित आहेत.
......
कोरोना काळात दिली अद्भुत सेवा
कोरोना महामारीमुळे मोठे गंभीर संकट उभे ठाकले अशात ज्या व्यक्तीला कोरोना झाला नसला तरी इतर आजारग्रस्त त्यांच्या संपर्कात येऊ नये यासाठी जनजागृती आणि काळजी घेण्याचे काम आशा सेविकांनी केले.
....
त्या आशा सेविकांचा सन्मान
कोरोना काळात आणि इतर वेळी आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करून लोकांना आरोग्य सेवा दिल्याबद्दल तालुक्यातील काही आशा सेविकांचा जिल्हा आणि तालुका स्तरावर सन्मान करण्यात आला. यात जयश्री किसन केंद्रे धानोली, उषा नरेश, लिल्हारे लटोरी आणि आशा दीनानाथ पटले रामाटोला यांचा समावेश आहे.
.....