गोंदिया : जिल्ह्यात जुलै महिन्यात हिवताप या किटकजन्य आजारामध्ये वाढ झाल्याचे लक्षात आल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. पावसाच्या डबक्यांमुळे आणि अस्वच्छतेमुळे आजार वाढू नये यासाठी सर्वेक्षण करून वेळीच उपाययोजना करण्याचे निर्देश आरोग्य प्रशासनाने दिले आहे. पावसाच्या दिवसात हिवताप, डेंग्यू, हत्तीरोग, चिकुनगुनिया आदी आजारांचा प्रसार डासांमार्फत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कीटकजन्य आजाराला वेळीच प्रतिबंध करण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हास्तरावरून उपाययोजना करण्यात येत आहे. प्रत्येक गावात गृहभेटीच्या माध्यमातून किटकजन्य आजाराबाबत नियमित सर्वेक्षण, विशेषत: जोखमीच्या गावावर विशेष लक्ष देण्यात येत आहे. गाव/टोला येथील डासोत्पत्ती स्थानांचा नायनाट करण्यासाठी रासायनिक प्रक्रियेद्वारे (जळलेले इंधन/वंगन टाकणे), जैविक प्रक्रियेतून (गप्पीमासे सोडणे) डासोत्पती स्थानांना कायमस्वरूपी नष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्ती, आरोग्य सहायक यांच्यामार्फत डास अळी सर्वेक्षण करून तातडीने उपाययोजना करण्यास सांगण्यात आले आहे. (जिल्हा प्रतिनिधी) नागरिकांनी काळजी घ्यावी कोणताही ताप आल्यास शासकीय आरोग्य संस्थेत रक्तजल नमुन्याची तात्काळ हिवतापविषयक तपासणी करु न औषधोपचार करु न घ्यावे. संपूर्ण शरीर झाकेल असा पोषाख, झोपताना डास प्रतिरोधक उपाययोजना, उदा.मच्छरदानी, डास पळवून लावणारे द्रावण, अगरबत्तीचा वापर करावा. घरात व आसपासच्या परिसरामध्ये पाणी साचवून ठेवू नये, पाणी साचले असल्यास आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून द्यावे. घरातील शौचालयाच्या व्हेंट पाईपला जाळी बसवावी. पाण्याचे साठे दर ७ दिवसांनी कोरडे करु न ठेवावे. घराच्या परिसरापासून खाताचे खड्डे, उकिरडे किमान १०० मीटर दूर करावे, अशा सूचना डीएचओ डॉ.श्याम निमगडे यांनी केल्या.
हिवताप नियंत्रणासाठी आरोग्य कर्मचारी सतर्क
By admin | Published: August 14, 2016 2:01 AM