सालेकसा : भारत हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. समाजातील तरुणाई व्यसनाच्या अधीन न जाता निर्व्यसनी असली पाहिजे. राष्ट्राचे खरे भवितव्य म्हणजे तरुणाई आहे. युवकांच्या भविष्यावर राष्ट्राचे भविष्य निर्भर असते म्हणून राष्ट्राची खरी संपत्ती असलेली तरुणाई सुदृढ व निरोगी असली पाहिजे तरच आपले राष्ट्र यशोशिखरावर जाऊन पोहोचेल. त्यासाठी तरुणाईने सावध राहून व्यसनांच्या विळख्यापासून दूर राहिले पाहिजे, असे प्रतिपादन राजाभाऊ कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.एस.दखने यांनी केले.
नेहरू युवा केंद्र गोंदिया, युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकारद्वारा राजाभाऊ कनिष्ठ महाविद्यालय साखरीटोला येथे आयोजित युवा मंडळ विकास कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून व्यसनाधीनता विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. सागर काटेखाये, पत्रकार पवन पाथोडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन लोकेश नागरीकर यांनी केले आभार मंगेश हत्तीमारे यांनी मानले.