ओव्हरलोड वाहतूक : संबंधित विभागाकडून डोळेझाक मुंडीकोटा : जवळच असलेल्या वैनगंगा नदीच्या घाटावरुन बिरोली या रेतीघाटांचा लिलाव महसूल विभाग तिरोडा यांनी केला आहे. पण रेती वाहतुकीसाठी रस्त्यांचे काय? असा प्रश्न गावकऱ्यांसमोर उभा आहे. गतवर्षी घाटकुरोडा रेतीघाटाचा लिलाव करण्यात आला, पण यावेळी तो घाट बंद आहे. त्यामुळे बिरोली या नवीन घाटाचा लिलाव करण्यात आला. बिरोली रेतीघाटावरुन रेती भरलेले ट्रक चांदोरी रस्त्याने धावत असतात. चांदोरी या रस्त्यावर एक नाला आहे. त्या नाल्यावर या ठेकेदाराने कच्चा पूल तयार केलेला दिसत आहे. ते रेती भरलेले ट्रक कच्च्या पूलवरुन निघून मुंडीकोटा रेल्वे गेटवरुन सरळ मारबतधोंडी या रस्त्यांने निघून संतोषी माता मंदिर नवेगाव या राष्ट्रीय महामार्गाला हा रस्ता जोडला आहे. त्यामुळे हे रेतीचे ट्रक सरळ नागपूर ते गोंदियाकडे धावत असतात. घाटकुरोडा, घोगरा हे रस्ते जीर्ण झाल्यामुळे या ठेकेदारांनी नवीनच रस्ता शोधला आहे. पण नवीन रस्ता जीर्ण होण्याच्या मार्गावर दिसत आहे. या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. तसेच गिट्टी व मुरुम उखडून बाहेर निघालेला दिसत आहे. त्यामुळे हा रस्ता अपघाताला आमंत्रण देत आहे. मुंडीकोटा रेल्वे गेटवरुन प्रवासी मुंडीकोटा रेल्वे स्टेशन तसेच शाळकरी विद्यार्थी याच रस्त्याने महाविद्यालयात ये-जा करीत असतात. तसेच घोगरा, घाटकुरोडा, पाटीलटोला या गावातील नागरिक मुंडीकोटा या गावी केंद्राचे ठिकाण असल्यामुळे देवाण-घेवाण, प्राथमिक आरोग्य केंद्र, बँक व बाजाराला येत असतात. त्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागतो. रेती भरलेल्या ट्रकची एकेरी वाहतूक असल्यामुळे अनेकांना रस्त्याच्या कडेला वेळ घालवत रहावे लागते. मुंडीकोटा रेल्वे चौकीजवळ लागूनच ४०० ते ५०० मांग गारुडी लोकांची वसाहत आहे. या रस्त्याच्या कडेला त्यांची घरे आहेत. त्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. रेती भरलेल्या ट्रकवर पाल अथवा ताडपत्री राहात नाही. त्यामुळे रेती उडून अनेकांच्या डोळ्यात शिरत असते. त्यामुळे डोळ्यांचा त्रास वाढलेला दिसत आहे. रेती जेसीबी मशीनद्वारे ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त भरली जाते. त्यामुळे रस्ते जीर्ण होत आहे. याकडे कुणाचेही लक्ष नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष घालून या रस्त्यांची दयनीय अवस्था दूर करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.(वार्ताहर)
रेतीच्या जड वाहनांनी रस्त्यांची लावली वाट
By admin | Published: February 19, 2017 12:14 AM