गोंदिया - जिल्ह्यात मंगळवारच्या रात्री 8 वाजेपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजिवन विस्कळीत झाले आहे. लहानमोठ्या नाल्यांना पूर आलेला आहे.त्यातच गोंदिया शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने ते घरात शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. बुधवारच्या पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास गेलेला न्यु लक्ष्मीनगर लोहीया वार्ड येथील रणजीतसिंग प्रीतमसिंग गिल वय 21 वर्ष पुराच्या पाण्याच्या प्रवाहात बाईकसह वाहून गेला आहे.
आपत्ती निवारण पथकाला माहिती होताच सकाळपासून शोध बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.राणी अंवतीबाई चौकात पुराचे पाणी 2-4 फुट रस्त्यावर असल्याने दुकानात पाणी शिरले.त्यातच रस्ता बांधकामामुळेही वाहनचालकांना रस्त्याच्या अंदाज येत नसल्यानेच ट्रक सुध्दा पलटला गेला आहे.कुडवा नाका परिसरात सुध्दा पाणी साचले आहे.तर अंडरग्राऊंडमध्ये सुध्दा पाणी भरल्याने वाहतुक विस्कळीत झालेली आहे.
अनेक वस्त्या पाण्याखाली
शहरातील रामनगर, मनोहर काँलनी, परमात्मा एक नगर, रिंग रोड या परिसरातील भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे या भागातील ये जा बंद झाली आहे. मंगळवारी रात्री झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील काही तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. तर पुजारीटोला, सिरपूरबांध या धरणांचे दरवाजे आज सकाळी उघडण्यात आले आहे. त्यामुळे नदी काठालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान पावसाचा जोर कायम राहिल्यास जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसामुळे शहरातील काही शाळांनी सुट्टी दिली आहे.