देवरी : तालुक्यात गेल्या ५-६ दिवसांपासून पडत असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे ग्राम वडेगाव येथील एका शेतकऱ्यांचे घर पडल्याची घटना शनिवारी (दि.११) रात्री १२ वाजतादरम्यान घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी शेतकरी कुटुंब उघड्यावर आले आहे.
शेतकरी भाऊलाल इसूलाल रहांगडाले कुटुंबासह झोपले असताना मुसळधार पावसामुळे त्यांचे मातीचे घर पडले. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, रहांगडाले यांच्या घरातील सिलिंग फॅन, दरवाजा, टेबल यासह जीवनावश्यक उपयोगी साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आधीच कोरोना महामारीमुळे आर्थिक विवंचनेत सापडलेले शेतकरी रहांगडाले यांचे जवळपास एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अशात शासनाने रहांगडाले यांना त्वरित घरकुल मंजूर करावे व शासनाच्या वतीने त्यांना त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.