गोंदिया : मागील दोन महिने दमदार पाऊस न पडल्याने धानपीक वाळण्याच्या मार्गावर आले होते, तर सिंचन प्रकल्पात सुध्दा मोजकाच पाणीसाठा असल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची काळजी वाढली होती. मात्र दोन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाने दमदार एन्ट्री केली. त्यातच गणरायाचे सुध्दा आगमन झाले. बाप्पाच्या आगमनासह पावसानेही दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांवरील दुष्काळाचे संकट टळले आहे. रविवारी सुध्दा जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे कोमात गेलेल्या पिकांना संजीवनी मिळाली आहे.
जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ४९.३ मि.मी. पावसाची नोंद झाली असून गोंदिया आणि गोरेगाव तालुक्यात ६५ मि.मी.पेक्षा अधिक पावसाची नोंद झाल्याने अतिवृष्टीची नोंद झाली. तसेच उर्वरित सहा तालुक्यांत सुध्दा दमदार पाऊस पडल्याने नदी, नाले दुथडी भरून वाहत होते. मागील दोन दिवसांपासून सर्वत्र पावसाचा जोर कायम असल्याने आणि गोरेगाव व गोंदिया तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाल्याने काही प्रमाणात घरांची सुध्दा पडझड झाली होती. रविवारीही (दि. १२) दिवसभर सर्वत्र पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यात सुध्दा वाढ झाली होती. तसेच धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्याने पुजारीटोला धरणाचे सहा दरवाजे १ फुटाने उघडण्यात आले होते. संततधार पावसामुळे शेतकऱ्यांवरील दुष्काळाचे सावट टळले आहे.
...........................
आतापर्यंत ८०.५ टक्के पावसाची नोंद
जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबरदरम्यान १२२० मि.मी. पाऊस पडतो. त्या तुलनेत १२ सप्टेंबरपर्यंत ९८२.१२ मि.मी. पावसाची नाेंद झाली असून एकूण सरासरीच्या ८०.५ टक्के पाऊस पडला आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने सरासरी गाठण्यास मदत झाली आहे.
...................
तलाव, बोड्या भरल्या
जिल्ह्यात मागील दोन-तीन दिवसांपासून पावसाच्या सरी बरसत असल्याने तलाव, बोड्या भरल्या असून शेतातील बांधामध्ये सुध्दा पाणी साचले आहे. त्यामुळे तूर्तास तरी धानपिकांवरील संकट टळले असून गणेशोत्सवाच्या आनंदात पावसाची भर पडली आहे.
..........
जिल्ह्यात तालुकानिहाय पडलेला पाऊस...
गोंदिया : ७६ मि.मी.
आमगाव : ४४.४
तिरोडा : ३३.४
गोरेगाव : ६७.३
सालेकसा : ६३.१
देवरी : ४६.८
अर्जुनी मोरगाव : २४.१
सडक अर्जुनी : ३३.४
----------------------------------------
एकूण सरासरी : ४९.३ मि.मी.