गोंदिया : डिझेल व पेट्रोलच्या किमतीत भरमसाट वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोनाने संपविलेल्या रोजगारावर आणखीनच संकट ओढवण्याचे काम पेट्रोल व डिझेल दरवाढीने केले आहे. त्यातच पुन्हा दुसरे लॉकडाऊन झाल्याने ऑटो चालक चांगलेच अडचणीत सापडले आहेत. राज्य सरकारने ऑटो चालकांना प्रत्येकी दीड हजार रुपयांची मदत करण्याचे जाहीर केले. परंतु गोंदिया जिल्ह्यातील १८२० रिक्षा चालकांना कवडीचीही मदत मिळाली नाही. कोरोनामुळे एकमेकांच्या जवळ येऊ नका, दाटीवाटीने प्रवास करू नका, अशा सूचना प्रशासनाने दिल्यामुळे ऑटो व्यावसायिक संकटात आले. कोरोनाच्या संसर्गामुळे दुसरे लॉकडाऊन करण्यात आले अन् ऑटो बंद झाले. शासनाकडून मदत देण्याची घोषणा केली पण मदत मिळालीच नाही.
..............
रिक्षा चालकांच्या प्रतिक्रिया
कोरोनाच्या संसर्गामुळे लोक अधिक पैसे खर्च करून स्वत:च्या वाहनाने प्रवास करू लागले. आता पुन्हा लॉकडाऊन झाल्याने आमचा रोजगार संपला. शासनाने ऑटो चालकांना मदत करण्याची घोषणा केली परंतु आतापर्यंत आम्हाला कसलीच मदत मिळाली नाही.
नंदू लांजेवार, ऑटोचालक खमारी
....
कोरोनाचा संसर्ग पुन्हा जोमाने सुरू झाला तेव्हापासून आतापर्यंत आमच्या रोजगारावर संकट आले. आधी आमची रोजी-रोटी चांगली सुरू होती. परंतु आता ऑटो रिक्षाकडे ग्राहकच भटकत नाहीत. आम्हाला आता रिक्षा बंद करावा लागला. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, हा प्रश्न आम्हाला पडला आहे. शासनाची मदत अद्याप मिळाली नाही.
-सतीश समुद्रे
अध्यक्ष, ऑटो रिक्षाचालक संघटना
.....
पहिल्या लॉकडाऊननंतर बहुतांश रेल्वेगाड्या बंद असल्याने रेल्वेस्थानकावरून येणाऱ्या प्रवाशांची संख्या नाहीच्या तुलनेत होती त्यामुळे लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरही धंदा मंदच होता आता पुन्हा ऑटो बंद झाल्याने पोट कसे भरणार? मदत देण्याची घोषणा केली परंतु ही घोषणा अद्याप पूर्ण झाली नाही.
-राजेश ठाकूर, रिक्षा चालक
.........
जिल्ह्यातील परवानाधारक रिक्षा- १८२०
परवाना नसलेले रिक्षाचालक-१५०