गोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जात आहे. गेल्या खरीप हंगामात या दाेन्ही विभागाने ५० लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली. पण अद्यापही या धानाची राइस मिलर्सने भरडाईसाठी उचल न केल्याने धान केंद्रावर तसेच पडून आहे. त्यामुळे या धानाची उचल करून गुदामात साठवून ठेवण्यासाठी लगतच्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यात गुदामांचा शोध घेतला जात असल्याची माहिती आहे.
गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामासह रब्बी हंगामातसुद्धा धानाची लागवड केली जाते. यंदा खरीप हंगामात ३५ हजार हेक्टरवर रब्बी धानाची लागवड करण्यात आली होती. येत्या दहा-पंधरा दिवसात रब्बीतील धान कापणीला सुरुवात होणार असून, मळणी करून तो बाजारपेठेत येण्याची शक्यता आहे. मात्र अद्यापही शासकीय धान खरेदी सुरू झाली नसून खरेदी केव्हा सुरू हेसुद्धा अद्याप निश्चित झाले नाही. खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानापैकी ३३ लाख क्विंटल धान अजूनही भरडाईसाठी उचल न झाल्याने तो गुदामातच पडला आहे. त्यामुळे गुदामे हाउसफुल असून, रब्बीत खरेदी केलेला धान ठेवायचा कुठे अशी समस्या निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेतसुद्धा भर पडली असून, रब्बीतील धान खरेदी कधी सुरू होते याकडे शेतकरी चातकासारखे लक्ष लावून आहेत. त्यामुळे शासनानेसुद्धा हालचाल करण्यास सुरुवात केली आहे. लगतच्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यात धान साठवून ठेवण्यासाठी गुदामे उपलब्ध होतात याची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. यावर काय तोडगा निघतो याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
.................