लोहारा : कोरोना महामारीच्या भीषण परिस्थितीत शाळा बंद असून मुले शाळा आणि शिक्षणापासून दूर आहेत. अशात चिचगड येथील अप्पर तहसील कार्यालयाच्या हद्दीतील रामपहाडी वांढरा येथील चावडीवर आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील गृहपाल किशोर देशकर आणि त्यांचे मित्र संतोष बनकर, योगेश देशमुख, सुशील देशमुख, नरेश नेवारे सकाळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करीत आहेत. खेळ, व्यायाम, योगासने, प्राणायाम करवून घेत छान छान गप्पागोष्टी, थोरपुरुषांचे चरित्र आणि भजन आरती विद्यार्थ्यांना शिकवीत आहे.
श्रीराम मंदिर परिसर आणि खाली चावडी परिसरात वृक्षारोपण अंतर्गत खूप झाडे लावण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांना आपल्या पशुपक्षी आणि प्राण्यांबदल जाण व्हावी म्हणून ‘प्रोजेक्ट धरती बचाव’अंतर्गत पक्ष्यांसाठी घरटी आणि पाण्याची व्यवस्था पण करण्यात आलेली आहे. देशकर यांनी आदिवासी समाजातील वैद्यक संस्कृतीवर एक लघु चित्रपट पण प्रदर्शित केलेला आहे. बाल व्यसन मुक्तीसाठी देशकर यांचे कार्य उल्लेखनीय आहे. त्यांनी यासाठी महाविद्यालये, आश्रमशाळा आणि वसतिगृहात जाऊन विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीसाठी मार्गदर्शन केले आहे. यासाठी पण त्यांनी ‘व्यसनाचा विळखा’ नावाचा लघु चित्रपट काढला आहे. आपण पण या कार्यात सहभागी व्हावे आणि सहकार्य करावे, असे आव्हान देशकर यांनी नागरिकांना केले आहे.