गोंदिया : महसूल आणि पोलीस विभाग यांच्यातील महत्त्वपूर्ण दुवा म्हणून पोलीस पाटील हे गावपातळीवर काम करीत असतात. जिल्हा आणि पोलीस विभागाला वेळाेवेळी गावातील घटना, घडामोडींची माहिती देण्याचे काम सुध्दा ते करतात. मात्र मागील चार वर्षांपासून राज्यातील १२४२२ पोलीस पाटलांची पदे भरण्यासाठी शासन आणि गृह विभागाला मुहूर्त सापडत नसल्याचे चित्र आहे.
राज्यात एकूण पोलीस पाटलांची ३८७१२ पदे मंजूर आहेत. यापैकी २६ हजार २९० पदे भरली असून १२४२२ पदे मागील चार वर्षांपासून रिक्त आहेत. ही पदे भरली नसल्याने सध्या एकाच पोलीस पाटलावर तीन ते चार गावांचा पदभार आहे. यामुळे पाेलीस पाटलांची सुध्दा चांगलीच तारांबळ होत आहे. पोलीस पाटलांची सर्वाधिक रिक्त पदे ही मराठवाड्यात आहेत. ठाणे व काेकण विभागात एकूण ३३६३ पदे मंजूर असून ११५० पदे रिक्त आहेत, तर पश्चिम महाराष्ट्रात ४९१६ पदे असून १८९० पदे रिक्त आहेत. सर्वाधिक रिक्त पदांची संख्या ही मराठवाड्यात आहे. या विभागात ४०५० पोलीस पाटलांची पदे रिक्त आहेत. विदर्भात पोलीस पाटलांची संख्या ९३०९ असून जवळपास ३५०० पदे रिक्त आहेत. राज्यात बीड जिल्ह्यात केवळ २११ पोलीस पाटलांची पदे भरली असून मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त आहेत. परभणी, जालना, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला या जिल्ह्यात सुध्दा रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मागील चार वर्षांपासून पोलीस पाटलांची रिक्त पदे भरण्यासाठी शासनाला वेळ मिळत नसल्याने रिक्त पदांचा अनुशेष हा वाढतच चालला आहे. कोरोना संक्रमणामुळे पुढील दोन वर्षे रिक्त पदे भरण्याची शक्यता कमीच आहे. मध्यंतरी मराठा आरक्षण लागू झाल्यामुळे नव्याने बिंदुनामावली तयार करण्यात आली होती. पण सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे आता पुन्हा नव्याने बिंदुनामावली तयार करावी लागणार असल्याने पोलीस पाटलांची रिक्त पदे भरण्यास विलंब होणार आहे.
...........
सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षे करा
राज्यात पोलीस पाटलांची पदे मागील चार वर्षांपासून रिक्त आहेत. त्यातच काेरोनाच्या संक्रमणामुळे पुन्हा दोन वर्षे भरती होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे पोलीस पाटलांच्या सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६५ वर्षे करण्यात यावे, अशी मागणी संघटनेकडून अनेक दिवसांपासून केली जात आहे.
......
मागील चार वर्षांपासून राज्यातील पोलीस पाटलांची रिक्त असलेली पदे भरण्यात यावीत यासंदर्भात गृह विभाग आणि शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र अद्यापही ही पदे भरण्यात आलेली नाहीत. कोरोना संक्रमण काळात सुध्दा आरोग्य विभाग आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे काम पोलीस पाटलांनी केले. त्यामुळे शासनाने रिक्त पदे त्वरित भरण्याची गरज आहे.
- भृंगराज परशुरामकर, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र गाव कामगार पोलीस पाटील संघटना.