आमगाव : तालुक्यातील किडंगीपार येथील क्रीडा संकुल सध्या केरकचरा घाणीच्या विळख्यात सापडले आहे. क्रीडा संकुल परिसरात सर्वत्र कचरा व गवत असून, पावसामुळे पाणी क्रीडा संकुलात पटांगणात साचत असल्याने पटांगणाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. एकंदरीत क्रीडा विभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे क्रीडा संकुल समस्यांचे माहेरघर झाले आहे.
स्थानिक क्रीडा संकुल येथे आमगाव शहरातील विद्यार्थी व विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक व क्रीडाप्रेमी येथे रोज फिरण्याकरिता व खेळण्याकरिता मोठ्या प्रमाणात येतात; पण क्रीडा संकुल हे विविध समस्यांचे माहेरघर बनले आहे. या ठिकाणी कचरा व घाणीचे साम्राज्य तयार झाले आहे. खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे व दर्जेदार खेळाडू घडावे यासाठी शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च करून तालुका क्रीडासंकुल केले. परंतु, या क्रीडा संकुलाच्या पटांगणापासून तर संकुल समस्यांचा विळखा घातला आहे. खेळाडूंना साधी सायकलसुद्धा आतमध्ये नेता येत नाही. अनेक खेळाडू पाय घसरून पडलेले आहेत. पटांगणात साप, विंचू विषारी यांची भीती व्यक्त केली जात आहे.
.............
साहित्य चोरीला जाण्याची शक्यता
संकुलच्या आत सुरुवातीला लोखंडी प्रवेशद्वार गंजलेला असल्याने त्याला कुलूपसु्द्धा लावता येत नाही. त्यामुळे साहित्य चोरीची शक्यता नाकारता येत नाही. पावसामुळे भिंतीना ओलावा येत असून, काही भिंतीवरून पाणी गळत आहे. बोअरवेलवर लावण्यात आलेले विद्युत पंप बंद असल्याने पाण्याच्या समस्येमुळे प्रसाधनगृहात घाण साचलेली आहे. वरच्या बॅडमिंटन हॉलमध्ये स्लॅबवर अनेक ठिकाणी गड्डे पडलेले आहेत. जिममधील अनेक साहित्य निकामी पडून आहेत. काही नवीन साहित्य धूळ खात पडलेले आहेत.
......
कर्मचाऱ्यांना मानधनाची प्रतीक्षा
येथे मानधन तत्त्वावर ठेवण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना मागील वर्षभरापासून मानधन मिळालेला नाही. त्यामुळे त्यांचेही या क्रीडा संकुलाकडे लक्ष नाही. इथे खेळायला येणाऱ्या खेळाडूंनी व काही नागरिकांनी क्रीडा अधिकारी यांना निवेदन देऊनही एक दीड वर्षापासून जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी या संकुलाला एकदाही भेट दिली नसल्याचे खेळाडूंनी सांगितले आहे.