ऑनलाईन लोकमतगोंदिया : केंद्र व राज्य शासनाच्यावतीने ग्रामीण भागातील नागरिकांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून घरकुलांचे बांधकाम केले जाते. यंदा गोंदिया जिल्ह्यात एक लाख कुटुंबांना घरकुल मंजूर करण्याचे उद्दिष्ट आहे. परंतु सडक-अर्जुनी तालुक्यात एकाही कुटुंबाने घरकूल बांधकामास सुरूवात केली नाही. त्यामुळे पालकमंत्री राजकुमार बडोले यांचा गृह तालुका असलेल्या भागातच घरकूल योजनेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.पंचायत समिती सडक-अर्जुनी येथे विविध योजनांच्या माध्यमातून घरकुलांचे बांधकाम मंजूर झाले आहेत. परंतु इंदिरा आवास योजनेच्या माध्यमातून सन २०१३-१४ पासून सन २०१५-१६ पर्यंत ३३७ घरकुलांचे काम अपूर्ण दाखविण्यात आले आहे. रमाई आवास योजनेच्या माध्यमातून सन २०१२ -१३ ते २०१३-१४ पर्यंत रमाई आवास योजनेंतर्गत ७३३ घरकुलांच्या बांधकामांना मंजुरी देण्यात आली होती. यातील ३५ घरकुलांचे बांधकाम अपूर्ण दाखविण्यात आले आहेत. राजीव गांधी ग्रामीण निवास क्र. १ अंतर्गत सन २०१२-१३ ला ३०१ घरकुल मंजूर करण्यात आले होते. यातील १३ कामे अपूर्ण दाखविली आहेत.प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सन २०१६-१७ मध्ये ५९९ कामे मंजूर करण्यात आली होती. यामधील ३२१ कामे अपूर्ण दाखविण्यात आली आहेत. रमाई योजनेंतर्गत सन २०१६-१७ मध्ये १०४ कामे मंजूर झाली. यातील ५५ कामे अपूर्ण आहेत. शबरी योजनेंतर्गत सन २०१६-१७ मध्ये ४८ घरकुल मंजूर झाले. त्यातील ४१ कामे अपूर्ण आहेत. सन २०१७-१८ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ७५७ कामांना मंजुरी देण्यात आली. पण प्रशासकीय मान्यता फक्त ५७० कामांना देण्यात आली. परंतु एकाही घरकुलाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली नाही. सन २०१२-१३ व २०१३-१४ पासून सन २०१६-१७ पर्यंत विविध योजनांच्या माध्यमातून तीन हजार ४०० घरकुलांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यातील ८०० घरकुलांची कामे अजूनही अपूर्ण आहेत.या घरकुलांच्या देयकाबाबत लाभार्थी सुद्धा वारंवार विचारणा करीत असतात. यावरुन ज्यांच्या घरकुलांचे बांधकाम पूर्ण झालेत. त्यांना सुद्धा घरकुलांचे देयक देण्यात आली की नाही, अशी शंका व्यक्त केली जात आहे.कामात मोठा घोळ?सडक-अर्जुनी तालुक्यात घरकुल योजनेत मोठा घोळ झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील पाच वर्षापासून घरकुलाचे बांधकाम प्रलंबितच दाखविले जात असल्याने त्या लाभार्थ्यांचे पैसे गहाळ तर झाले नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील शिक्षकांचे कोट्यवधी रूपये लिपीक व शिक्षण विभागाच्या माध्यमातून हडपण्यात आले. तसाच प्रकार घरकुलासंदर्भात तर झाला नाही अशी शंका व्यक्त केली जात आहे. यासंबंधीची तक्रार सुद्धा मंत्रालयाकडे करण्यात आली आहे.
पालकमंत्र्याच्या गृहक्षेत्रात घरकुलांचा बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 9:36 PM
केंद्र व राज्य शासनाच्यावतीने ग्रामीण भागातील नागरिकांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून घरकुलांचे बांधकाम केले जाते.
ठळक मुद्दे५७० घरकुलांना प्रशासकीय मान्यता : नऊ वर्षापासून काम अपूर्णच