विजय मानकर
सालेकसा : बळिराजाचा सर्वांत मोठा उत्सव म्हणून ओळख असलेला सण म्हणजे पोळा. यात बैलपोळा साजरा करण्याची परंपरा हजारो वर्षांपासून कायम असून, मागील वर्षापासून या सणावर काही मर्यादा आल्या आहेत. तरी यंदा सणाचा उत्साह वाढलेला दिसत आहे. कारण सध्या राज्यात याबाबत तेवढे कडक निर्बंध ठेवण्यात आले नाही.
‘आला आला पोळा सण झाले गोळा’ असे म्हटले जाणारा पोळ्याचा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी कुशावरी अमावास्येला साजरा केला जातो. शेतकऱ्याचे खरे दैवत व वर्षभर राबराब राबणाऱ्या आपल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासोबतच त्याचे गोड कौतुक करण्यासाठी बळिराजा आजही पारंपरिकरीत्या उत्साहाने बैलपोळा साजरा करतो. तीन दिवस चालणाऱ्या पोळ्याच्या सणाला पहिला दिवस म्हणजे मोहबिलचा असतो. या दिवशी बैलांना आमंत्रण (अवतण) देण्यात येते. शेतात राबताना मानेवर आणि शरीराच्या इतर भागावर जखमा झालेल्या असतात. त्या जखमांवर हळद तेलाचा लेप लावण्यात येतो. सोबतच मोठ आणि पिठाचे गोळे खाऊ घातले जातात. बैलांची अंघोळ करून त्यांना गोडधोड अन्नाचा नैवेद्य दिला जातो.
दुसरा दिवस हा बैल पोळा म्हणून साजरा केला जाणारा असून, बैलपोळ्याला बैलांना नदी किंवा तलावात नेऊन अंघोळ घातली जाते. घरी आणून त्यांना शरीरावर रंगाचे ठिपके, पाठीवर झुल्या, शिंगांना बेगळ, डोक्यावर बाशिंग, गळ्यात फूल व बेलपत्रांची माळ, सोबतच घुंगरू माळ आणि नवीन वेसण, नवा कासरा अशा विविध वस्तू नेसवून सजविले जाते. पुरण पोळी खाऊ घालून नवरदेवाचे स्वरूप आलेल्या बैलांना गाव शिवारात बांधलेल्या तोरणाखाली नेण्यात येते. तेथे पूजा-आरती आणि झळत्या म्हटल्या जातात. त्यानंतर गावचा पाटील किंवा मानवाईक व्यक्तीच्या हस्ते तोरण तोडले जाते व पोळा फुटते.
बॉक्स
तालुक्यातील ६० गावांमध्ये भरतो पोळा
सालेकसा तालुक्यात जवळपास ६० गावांमध्ये पोळा भरविण्यासाठी गाव शेजारी तोरण बांधले जाते व गावात मिरवणूक काढून प्रत्येक घरातील बैलजोडी ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत तोरणाला नेली जाते. सालेकसा (आमगाव खुर्द) गावाला आता शहराचे स्वरूप येत असले तरी गावाच्या मधोमध गोवारी चौकात दरवर्षीप्रमाणे यंदाही पोळा साजरा होत आहे. मात्र, मागील वर्षी कोरोना निर्बंधामुळे परंपरा कायम ठेवण्यासाठी नाममात्र सण साजरा करण्यात आला होता. यंदा प्रत्येक गावासह सालेकसात कोरोना नियम पाळत पोळा भरविला जात आहे. परंपरेनुसार येथे पोळ्याची मिरवणूक काढली जात असून, गावचे प्रमुख पाटील म्हणून मान मिळविणाऱ्या स्व. नारायण बहेकार (माजी आमदार) यांच्या वाड्यातून आरती आणि पहिली बैलजोडी तोरणात नेली जाते. त्यानंतर एका मागे एक अशाप्रकारे गावातील सर्व बैलजोड्या तोरणात नेल्या जातात.
बैलजोड्यांची संख्या आली अर्ध्यावर
एकीकडे यांत्रिक शेतीचे प्रमाण वाढले, तर दुसरीकडे वाढत्या महागाईमुळे घरी बैलजोडी पाळणे फार तोट्याचे व खर्चिक झाले असल्याने अनेक शेतकऱ्यांनी बैलजोडी ठेवणे बंद केले. मोठे शेतकरी ज्यांच्याकडे एकापेक्षा जास्त बैलजोडया असायच्या, त्यांनी आता एकच बैलजोडी ठेवण्यास महत्त्व दिले आहे. सोबतच बैलांची किंमत मोठ्या प्रमाणावर वाढली असून, सर्वसामान्य शेतकऱ्याला बैलजोडी खरेदी करणे आवाक्याबाहेर झाले आहे. तसेच सतत त्यांची सेवा करणेसुद्धा कठीण होऊ लागले आहे. अशात तोरणात आता बैलजोड्यांची संख्या अर्ध्यावर आली आहे. बैलजोड्यांची संख्या घटली असता बैल नसले तरी पोळा साजरा करण्यासाठी अनेक शेतकरी मातीचे बैल बनवून त्यांची पूजा करतात. तिसऱ्या दिवशी तान्हा पोळानिमित्त लाकडाच्या नंदीची पूजा करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.