लोहारा : मानव धर्माचे संस्थापक बाबा जुमदेव यांना पद्मश्री पुरस्कार देण्याची मागणी देवरी तालुक्यातील सेवकांनी केली आहे. बाबा जुमदेव यांनी मानव धर्माची स्थापना करून अनेकांना व्यसनापासून परावृत्त केले आहे. शासन दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करून नागरिकांना वाईट व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन करते. एवढेच नाही तर दारू सोडविण्यासाठीही विविध उपक्रम राबविले जातात. मात्र त्याचा फारसा उपयोग होत नाही. परंतु बाबा जुमदेव यांच्या मानव धर्माच्या शिकवणीमुळे शेकडो नागरिक दारूच्या व्यसनापासून दूर झाले.
अंधश्रद्धा निर्मूलन, मर्यादित कुटुंब, हुंडा पद्धतीला आळा, स्त्री भृणहत्या आळा यासारखे कार्य हाती घेऊन ते पूर्ण केले. त्यांच्या मृत्यू पश्चात आजही हे कार्य अविरत सुरू आहे. अशा या मानव धर्माची शिकवण देणाऱ्या आणि अनेक कुटुंबांना सुखी करणाऱ्या बाबा जुमदेव यांना केंद्र सरकारने पद्मश्री हा पुरस्कार देऊन सन्मानित करावे अशी मागणी देवानंद मेश्राम, कैलाश नागरीकर, श्याम जगने, देवराज जगने, देवदास नाईक, विनोद गभने, इंद्रपाल तांडेकर, वसंता देसाई, अंकुश हटवार, प्रवीण नागरीकर, जीवन आकरे, भस्मे, धर्मेंद्र गायकवाड, प्रवीण मेश्राम, प्रफुल खोब्रागडे, मुलचंद मोहबे, मंगेश चौबे, काजू मेश्राम, शुभम सोनवाने, राजू सोनवाने, ओमराज तांडेकर या सेवकांनी केली आहे.