गोंदिया : कोरोनाने बदलेल्या नव्या डेल्टा प्लस या रूपामुळे राज्यात पुन्हा एकदा खळबळ माजवून दिली आहे. डेल्टाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असल्याने राज्य शासनाने नव्याने निर्बंध घातले आहेत. यात आता पुन्हा एकदा हॉटेल व्यवसायावर त्याचा परिणाम पडणार आहे. आता सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ४ वाजेपर्यंत हॉटेल्स सुरू ठेवता येणार आहेत. विशेष म्हणजे, हॉटेलिंगची वेळच रात्री सुरू होत असल्याने हॉटेल व्यावसायिक अडचणीत आले आहेत. त्यात शनिवार व रविवारी पूर्णपणे बंद ठेवण्याची वेळ आल्यास त्यांचा पूर्णपणे दिवाळे निघण्याची पाळीच येणार असल्याचे हॉटेल व्यावसायिक बोलत आहेत.
-----------------------------
शहरातील एकूण हॉटेल्स - १५०
हॉटेलवर अवलंबून असलेले कर्मचारी- ७५०
---------------------------
सोमवार ते शुक्रवार ५० % क्षमता राहणार
नव्या निर्बंधानुसार हॉटेल्स सोमवार ते शुक्रवार ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येणार आहेत. यात लहान हॉटेल्सचे ठीक आहे. मात्र, मोठ्या हॉटेलवाल्यांची अडचण आहे. हॉटेलिंगची वेळच रात्री ८ वाजेनंतर सुरू होते. त्यात हॉटेल्स सायंकाळी ४ वाजता बंद करायचे आहेत. अशात मात्र हॉटेलवाल्यांनी व्यवसाय कसा करायचा, हा प्रश्न त्यांना पडला आहे. शहरात दिवसा हॉटेलात जेवण करायचा ट्रेंड नाही. रात्रीलाच हॉटेलिंगची वेळ असते. मात्र, आता निर्बंधांमुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत आला आहे.
------------------------------
हॉटेल व्यवसाय पुन्हा कधी उभा राहणार?
दुसऱ्या लॉकडाऊनने पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकले. आता काही दिवस होत नाही तोच पुन्हा निर्बंध लावले जात आहेत. अशात आमचे कर्ज, कर्मचाऱ्यांचे वेतन, भाजीपाला-किराणा व अन्य दैनंदिन खर्च सुरूच आहेत. कधी चांगले दिवस येणार याची आम्हीच वाट बघत आहोत.
-अखिलेश सेठ
अध्यक्ष, जिल्हा रेस्टॉरंट असोसिएशन.
--------------------------------
हॉटेल व्यावसायिकांनी कर्ज घेऊन काम सुरू कले आहे. त्याची किश्त कशी भरायची, कर्मचाऱ्यांचा पगार द्यायचा कसा, दैनंदिन खर्च कसे करायचे, असा प्रश्न आता आम्हाला पडला आहे. दुसऱ्या लॉकडाऊननंतर आता पुन्हा नव्याने निर्बंध आल्याने आम्ही पूर्णपणे खचलो आहोत.
-राजेश चावडा
वरिष्ठ सदस्य, जिल्हा रेस्टॉरंट असोसिएशन.
----------------------------------
हॉटेल कर्मचाऱ्यांचे तर आणखी हाल
पहिला लॉकडाऊन झाल्यापासूनच आमचे कठीण दिवस सुरू झाले. आता दुसऱ्या लॉकडाऊननंतर काम सुरू होत होते. त्यात पुन्हा नव्याने निर्बंध लागले आहेत. अशात आमच्या कामाचीही शाश्वती नसून कुटुंबाचे पालन पोषण कसे करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- विकास श्रीवास्तव (हॉटेल कर्मचारी)
-----------------------------
कोरोनामुळे हॉटेल व्यवसाय मोठ्या संकटात सापडला आहे. हॉटेल सुरू ठेवण्याची वेळ हॉलेटिंगच्या वेळेला माफक नाही. त्यामुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत आला आहे. परिणामी, आमची नोकरीसुद्धा अडचणीत असते. पुढे कसे करायचे, याची चिंता सतावत आहे.
- संतोष राऊत (हॉटेल कर्मचारी)