गोरेगाव (गोंदिया) : घरावर वीज पडून घर जळाल्याची घटना शनिवारी (दि. १०) दुपारच्या सुमारास तालुक्यातील सोनी येथे घडली. सुदैवाने ज्यावेळी वीज पडली त्यावेळी घरात कुणी नसल्याने मोठी जीवितहानी टळली.
प्राप्त माहितीनुसार शनिवारी दुपारी ३ वाजेया सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. दरम्यान, सोनी येथील देवचंद घारपिंडे यांच्या घरावर वीज कोसळली. यामुळे घराच्या छपराला आग लागली. गावकऱ्यांना घराला आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी घारपिंडे यांच्या घराकडे धाव घेत आग विझविण्यास सुरुवात केली. मात्र, आग आटोक्यात येत नसल्याने गोरेगाव नगरपंचायतच्या अग्निशमन वाहनाला पाचारण करण्यात आले. काही वेळातच अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल झाले. यानंतर आग आटोक्यात आली. मात्र, यामुळे घारपिंडे यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने ज्या ठिकाणी वीज पडली त्या ठिकाणी कुणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली. तलाठ्याने घटनास्थळावर पोहोचत नुकसानीचा पंचनामा केला. घारपिंडे यांना शासनाने नुकसानभरपाई देण्याची मागणी माजी बांधकाम सभापती रेवेंद्रकुमार बिसेन यांनी केली आहे.