गोंदिया : राज्यात अनेक विषयांवरुन काँग्रेस-भाजपा जनतेच्या डोळ्यात धूळ फेकत आहे. ओबीसी आरक्षण असो कि, कोरोनाची भीषण परिस्थिती असो, नोकर भरती असो. राज्यात अनेक तरुण व उच्च शिक्षीतांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहेत. तर बेरोजगारीने तरुणांना आत्महत्येचा मार्ग अवलंबवावा लागत आहे. राज्यातील जीवन मरणाच्या अनेक महत्वपूर्ण प्रश्नांवर आवाज न उठवता पटोले-फडणवीस एकमेकांवर आगपाखड करुन जनतेला मूर्ख बनवित आहेत. भाजप-काँग्रेसने आधी गोंदिया जिल्हा परिषदेत भाजप कॉँग्रेसची युती कशी हे स्पष्ट करावे. मगच नैतिकतेच्या गप्पा माराव्यात असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीच्या प्रभारी अध्यक्ष रेखा ठाकूर यांनी केले.
महाराष्ट्राच्या संघटन समीक्षा व संवाद दौऱ्यांतर्गत गोंदिया आल्या असता येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर राज्य उपाध्यक्ष गोविंद दळवी, महिला आघाडी महासचिव अरुंधती क्षिरसाट, विदर्भ समन्वयक समितीचे राजू लोखंडे, राजू झोडे, किशोर कैथल उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष सतीश बन्सोड यांनी, संपूर्ण जिल्ह्यात संघटनेची बांधनी आणि यावर विस्तृत माहिती देऊन भविष्यात एक पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन दिले.
प्रास्ताविक मांडून संचालन शहर प्रमुख विनोद मेश्राम यांनी केले. आभार सचिव राजीव राहूलकर यांनी मानले. सभेसाठी जिल्हा उपाध्यक्ष विनोद मेश्राम, एस.डी. महाजन, प्रकाश डोंगरे, प्रफुल्ल लांजेवार, किरण फुले, सुनीता भालाधरे, सिद्धार्थ हुमने, सुरेंद्र खोब्रागडे, विनोद जांभुळकर, के.टी. गजभिये यांच्यासह सर्व तालुकाध्यक्ष व कार्यकारिणी सदस्यांनी सहकार्य केले.