गोंदिया : यंदा रब्बी हंगामातील धान खरेदीचा तिढा शासन आणि प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे सुरुवातीपासून वाढला आहे. याचा फटका मात्र रब्बी धान उत्पादक हजारो शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. रब्बीच्या धान खरेदीसाठी केवळ नऊ दिवसांचा कालावधी शिल्लक असताना, आतापर्यंत केवळ ७ लाख क्विंटल धान खरेदी झाली आहे. २३ लाख क्विंटल धान खरेदी होणे अद्याप शिल्लक आहे. त्यामुळे नऊ दिवसांत एवढी धान खरेदी होणे शक्य नसल्याने शेतकऱ्यांना पुन्हा व्यापाऱ्यांच्या दारात उभे राहावे लागणार आहे.
जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत दरवर्षी खरिपानंतर रब्बीतील धानाची शासकीय धान खरेदी केली जाते. या धान खरेदीची मुदत ३० जूनपर्यंत असते. याचदरम्यान पावसाळ्याला सुरुवात होत असल्याने शासकीय धान खरेदी बंद केली जाते. मात्र यंदा मागील खरीप हंगामातील धानाची उचल झाली नसल्याने रब्बीतील धान खरेदी सुरू होण्यास विलंब झाला आहे. गोदामे रिकामी झाली नसल्याने ३७ लाख क्विंटल धान गोदामात पडले आहे. हीच स्थिती पूर्व विदर्भातील उर्वरित पाच जिल्ह्यांची आहे. खरीप हंगामाला सुरुवात झाली, तर रब्बी धान खरेदीचा तिढा सुटला नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांना घरी धान ठेवण्यासाठी जागा नाही, शिवाय धानाची विक्री करूनच ते खरिपाचे नियोजन करीत असतात. त्यामुळे दोन्हीकडून त्यांची कोंडी झाली आहे. परिणामी त्यांना खासगी व्यापाऱ्यांना १३०० रुपये प्रति क्विंटल दराने धानाची विक्री करावी लागत आहे. यामुळे त्यांना प्रति क्विंटल चारशे ते पाचशे रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. मात्र यानंतरही शासन आणि प्रशासन सगळे ऑल इज वेल असल्याचे दाखवित आहे.
...................
महिनाभरात ७ लाख क्विंटल धान खरेदी
जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने रब्बीतील धान खरेदीसाठी ११४ शासकीय धान खरेदी केंद्र सुरू केले आहे. या केंद्रावरून आतापर्यंत केवळ ७ लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे, तर आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदीची स्थिती यापेक्षा बिकट आहे. त्यामुळे यंदा रब्बीतील पूर्ण धान खासगी व्यापाऱ्यांनाच विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून, हमीभावापासून वंचित राहावे लागले.
................
केवळ ३ लाख क्विंटल धानाची उचल
गेल्या खरीप हंगामातील ३३ लाख क्विंटल धानापैकी आतापर्यंत राईस मिलर्स भरडाईसाठी केवळ ३ लाख ११ हजार क्विंटल धानाची उचल केली आहे. त्यामुळे ३० लाख क्विंटल धान अद्यापही विविध गोदामांमध्ये पडला आहे. धान भरडाईसाठी २८८ राईस मिलर्सने करार केले असून, प्रत्यक्षात ७० ते ७५ राईस मिलर्सने धानाची उचल केली असल्याने समस्येत वाढ झाली आहे.
..............
चुकारे आणि बोनस थकले
खरीप हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या १ लाख ४० हजार शेतकऱ्यांना बोनसची रक्कम अद्यापही मिळाली नाही, तर रब्बी हंगामात ७ लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली असून, त्याचे १३४ कोटी रुपयांचे चुकारे थकले आहेत. त्यामुळे बळीराजाची आर्थिक कोंडी झाली आहे.