गोंदिया : आजघडीला प्रत्येकच वस्तूचे दर वधारले असून सर्वसामान्यांना आता बाजारात जाणे म्हणताच धडकी भरू लागते. रशिया व युक्रेनमधील युद्धाचे पडसाद आता उमटू लागले असून खाद्यतेलाचे भाव वधारल्यानंतर आता किराणामालही वधारत चालला आहे. यात भाजीपाला आता मागे राहिला नसून भाजीपाल्याचे दरही चांगलेच वधारले आहे.
आज बाजारात ४०-५० रुपयांच्या आत एकही भाजी मिळत नाही अशी स्थिती आहे. विशेष म्हणजे, हिरवी मिरचीचे भाव सध्या ८० रुपयांवर पोहचले असून मिरची चांगलीच तिखट झाली आहे. तर हिरव्या भाज्या आता संपत आल्याने त्यांचे दर वधारले आहे. किराणा माल वधारला असतानाच स्वयंपाक घराचे बजेट बिघडले असून, त्यात आता भाजीपाल्याचे दर ऐकताच घाम फुटत आहे. अशात मात्र सर्वसामान्यांनी काय खावे असा प्रश्न पडतो. शासनाने महागाई नियंत्रणात आणून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा ही एकच मागणी जनता करीत आहे.
२) पालेभाजीही महागली
हिवाळा म्हणजे पालेभाज्यांचा काळ असतो मात्र आता उन्हाळ्याला सुरुवात झाली असल्यो पालेभाज्यांचा काळ संपला आहे. परिणामी पालेभाज्यांची बाजारात आवक कमी झाली आहे. म्हणूनच आता पालेभाज्या चांगल्याच महागल्या आहेत.
३) शेतकऱ्यांचे गणित बसेना
भाजीपाला लागवड करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. शिवाय मजुरीही जास्त लागत असल्याने शेतकरी साधारणत: भाजीपाला लागवड करीत नाही. त्यातल्या त्यात वातावरणात बदल झाल्यास रोगराईमुळे सर्व मेहनत वाया जाते. म्हणूनच भाजीपाला लागवड परवडत नाही.
- मंसाराम चिखलोंडे
यंदा अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे भाजीपाला पिकांचे चांगलेच नुकसान झाले आहे. भाजीपाला लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येतो. मात्र तेवढीच मेहनत असून रोगराई आल्यास हाती काहीच येत नाही. यामुळेच भाजीपाला लागवड करणे धोक्याचे असून परवडणारे ठरत नाही.
- निहारीलाल दमाहे
खाद्य तेल व किराणामालाचे दर अवाढव्य वाढले असून सर्वसामान्यांना परवडणारे राहिलेले नाही. त्यात आता भाजीपाला वधारल्याने दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
- देवा शेंडे
आता उन्हाळा लागल्याने हिरवा भाजीपाला मिळणार नाही. यामुळेच आवक कमी झाली असून त्यांचे दर वदारले आहे. शिवाय सर्वच भाजीपाला महागला आहे. सर्वसामान्यांनी काय खावे असा प्रश्न पडतो.
- महेंद्र तिडके