गोंदिया : कोरोनाच्या काळात आरोग्य यंत्रणा व पोलीस या दोन विभागांवर सर्वात मोठा कामाचा ताण आहे. या ताणतणावात काम करणाऱ्या आरोग्य अधिकारी, कर्मचारी किंवा पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना शारीरिक थकव्याबरोबर मानसिक थकवादेखील आला आहे. परंतु कर्मचाऱ्यांचा, अधिकाऱ्यांचा मानसिक थकवा घालविण्यासाठी या दोन्ही विभागाकडून पाहिजे तसे प्रयत्न केले जात नाही. पोलीस विभाग मध्ये मध्ये काही कार्यक्रम घेते. परंतु आरोग्य विभागाने तर या मानसिक थकवा काढण्याकडे सपशेल दुर्लक्षच केले आहे. कमी कालावधीत मानसिक थकवा काढायचा असेल तर कर्मचाऱ्यांना आठवड्यातून एक दिवस सुट्टी देणे आवश्यक आहे. त्यांच्या कामाचे तास नियोजित करावे, महिन्यातून ट्रेस स्क्रीनिंगचे आयोजन करून यात आढळलेल्या ताणतणावातील कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करावे किंवा औषधांच्या माध्यमातून त्यांचा ताण कमी करावा. ज्या विभागात रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागा भरून काढाव्यात, कर्मचाऱ्यांना अधिकचा प्रोत्साहन भत्ता द्यावा, योगासनांचे व मेडिटेशनचे शिबिर घ्यावेत जेणेकरून ताण कमी होईल, असे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. लोकश चिर्वतकर म्हणाले.
.........................
पोलिसांंना मानसिक ताण राहू नये यासाठी आम्ही कोविडच्या काळातही ऑनलाइन शिबिर घेतले. योगाचे धडे देण्यात आले. जो कर्मचारी तणावात आहे असे वाटल्यास त्याचे तज्ज्ञांकडून समुपदेशनही केले जाते.
-विश्व पानसरे, पोलीस अधीक्षक, गोंदिया
.......
आरोग्य कर्मचाऱ्यांना मानसिक तणाव राहू नये म्हणून प्रत्येकाला सुट्टी मिळत असते. मानसिक तणाव येऊच नये हा आमचा पहिला प्रयत्न असतो. तरीदेखील त्यांच्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते.
- डॉ. अमरिश मोहबे, जिल्हा शल्य चिकित्सक, गोंदिया
...........
तणावात असलेल्या पोलीस किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करावे किंवा औषधांच्या माध्यमातून ताण कमी करावा. रिक्त जागा भरून कामाचा ताण कमी करावा. महिन्याकाठी ट्रेस स्क्रीनिंग शिबिराचे आयोजन करावे. योगासनांचे व मेडिटेशनचे शिबिर घ्यावेत.
-डॉ. लोकश चिर्वतकर मानसोपचार तज्ज्ञ, गोंदिया.
एकूण आरोग्य कर्मचारी- ३०००
एकूण डाॅक्टर्स- १००
एकूण पोलीस- २११०
पोलीस अधिकारी- १२८
.........................
कुटुंब आणि नोकरी सांभाळण्याची कसरत
१) कोरोनाच्या काळात पोलिसांची आणखीणच जबाबदारी वाढली. पोलीस ठाण्यात कामांना पूर्णविराम देऊन सर्व पोलिसांना रस्त्यावर येऊन उभे राहावे लागत आहे. कोरोनाचे नियम तोडणाऱ्यांना लगाम लावण्यासाठी काम करणे आणि कोरोनाच्या संकटापासून आपले व आपल्या कुटुंबाचे संरक्षण करणे ही मोठी कसरत आहे.
- एक पुरुष पोलीस कर्मचारी
...............................
महिला पोलीस कर्मचारी म्हणून काम करताना सतत ड्यूटी, त्यात शरीराला आराम नाही. वेळेच्या आत सर्व काम व्हावे यासाठी सतत तणाव असतो. कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांच्या डोक्यावर नेहमीच ताण असतो.
एक महिला पोलीस कर्मचारी.
..................
आरोग्य विभागात काम करताना आता कोविडच्या काळात कोरोनासोबत लढा देताना अनेक कर्मचारी ताणतणावात राहूनच काम करतात. परंतु बहुदा अधिकारी त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. या संदर्भात एखाद्या कर्मचाऱ्याने म्हटले तर त्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याच्या धमक्या मिळतात.
-एक पुरुष आरोग्य कर्मचारी
.............................
कोविड सोबत लढताना फ्रंटवर्कर म्हणून आरोग्य कर्मचारी सतत राबवत असून, मानसिक तणावात काम करीत असतात. कोविडच्या वाॅर्डात काम केल्यावर आम्हाला सुट्टी तर मिळते; परंतु आपल्या कुटुंबातील लोकांसोबत आम्ही वावरू शकत नाही. रुग्णांची संख्या वाढल्याने कामाचा ताणही मोठ्या प्रमाणात आहे.
- एक परिचारिका, गोंदिया