केशोरी : राज्यातील दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ म. रा., पुणे यांच्यामार्फत घेतली जाते. या वर्षी कोरोनाच्या महामारी संकटामुळे शाळा मार्चपासून बंद होत्या. या वर्षीचे शैक्षणिक सत्र सुरूच झाले नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन शिक्षणप्रणालीमधून शैक्षणिक नुकसान टाळण्याचा शासनाकडून प्रयत्न करण्यात आला. परंतु शारीरिक शिक्षणाचे, समाजसेवा, कार्यानुभव या ग्रेड विषयाचे शिक्षण देणे अजूनही बंद आहे. त्यामुळे या वर्षी दहावी व बारावीच्या परीक्षेत शारीरिक शिक्षण, समाजसेवा या विषयांची श्रेणी कशी द्यावी, असा प्रश्न निर्माण झाला.
या संदर्भात परीक्षा मंडळाने मार्गदर्शन करावे, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेचे अर्जुनी मोरगाव तालुकाध्यक्ष प्रा. दिनेश नाकाडे यांनी केली आहे. कोरोना महामारीच्या संकटात शाळा बंद होत्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शासनाने ऑनलाईन शिक्षणप्रणाली कार्यान्वित करून थोडीफार शैक्षणिक नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न केला. ऑनलाईन शिक्षणप्रणालीमध्ये विद्यार्थी फारसे समाधानी नव्हते. आदिवासी व ग्रामीण भागात फक्त या प्रणालीला २५ टक्के विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच शासनाने २३ नोव्हेंबरपासून दहावी व बारावीचे वर्ग सुरू केले आहेत; परंतु यामध्ये इंग्रजी, विज्ञान, गणित या प्रमुख विषयांचे शिक्षण देणे सुरू असल्याने शारीरिक शिक्षणासारख्या मैदानी शिक्षणाचे शिक्षण बंद असल्याने शारीरिक शिक्षण या विषयाचा ग्रेड कशी द्यायची, असा प्रश्न मुख्याध्यापकांसह शारीरिक शिक्षकांना पडला आहे.
.....
शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना काढव्यात
राज्य शिक्षण मंडळाने मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात. सध्या दहावी-बारावीच्या शाळा सुरू असल्यामुळे परीक्षा मंडळाकडून लेखी परीक्षा निश्चितच घेतली जाईल. परंतु शारीरिक शिक्षण, समाजसेवा, कार्यानुभव हे श्रेणी विषय असल्यामुळे निकालात महत्त्वाचे समजले जातात. या विषयाच्या संदर्भात शासनाकडून कोणत्याही सूचना नाहीत किंवा प्रशिक्षणाचे आयोजनही केले नाही. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. परीक्षा मंडळाने मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात; जेणेकरून विद्यार्थ्यांचे त्याप्रमाणे रेकाॅर्ड तयार करण्यात मदत होईल, असे शिक्षक भारती संघटनेचे अर्जुनी-मोरगाव तालुकाध्यक्ष प्रा. दिनेश नाकाडे यांनी केले आहे.