गोंदिया : पेट्रोल, डिझेलसह घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतींमध्येही सातत्याने वाढ होत आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात ६६४ रुपयांना मिळणाऱ्या गॅस सिलिंडरसाठी ८७५ रुपये मोजावे लागत आहेत. सात महिन्यांच्या कालावधीत तब्बल २२५ रुपयांची भाववाढ झाली आहे. त्यामुळे अनेकांचे बजेट बिघडले आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती सातत्याने वाढत असताना त्यावरील सबसिडी मात्र कपात केली जात आहे. गॅस सिलिंडरधारकांना ३० ते ४० रुपयांची सबसिडी दिली आहे. वाढत्या किमतींमुळे गृहिणींचीसुद्धा महिन्याचे बजेट सांभाळताना चांगलीच दमछाक होत आहे. ‘वाढत्या महागाईमुळे जगायचे कसे तुम्हीच सांगा,’ असा सवाल सर्वसामान्य नागरिकांनी केंद्र सरकारला विचारला आहे.
..................
घर खर्च भागवायचा कसा?
कोरोनामुळे आधीच रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच कर्मचाऱ्यांच्या पगारातही कपात केली आहे. अशात पेट्रोल, डिझेलसह गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. सुरुवातीला ४०० रुपयांना मिळणाऱ्या गॅस सिलिंडरसाठी आता ९०० रुपये मोजावे लागत आहेत; यामुळे महिनाभराच्या खर्चाचा ताळमेळ जुळविताना चांगलीच दमछाक होत आहे.
- कविता शिवणकर, गृहिणी
..............
वाढत्या महागाईमुळे आधीच गृहिणींचे बजेट बिघडले आहे. त्यातच आता गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ केली जात असल्याने पुन्हा चुलीकडे वळण्याची वेळ आली आहे. उत्पन्न स्थिर असून महागाई मात्र सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. केंद्र सरकारने किमान गॅस सिलिंडरच्या किमती कमी करण्याची गरज आहे.
- श्वेता मस्के, गृहिणी
................
फेब्रुवारी महिन्यात उच्चांकी वाढ
यंदा फेब्रुवारी महिन्यात गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये उच्चांकी वाढ झाली आहे. गॅस सिलिंडरच्या किमती तब्बल ११० रुपयांनी वाढल्याने ६६४ रुपयांच्या सिलिंडरसाठी तब्बल ७६९ रुपये मोजावे लागले आहेत. त्यानंतरही दरवाढ कायम असल्याने अनेकांनी पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे.
.....................
गावात पुन्हा पेटल्या चुली
- ग्रामीण भागातील महिलांना चूल आणि धूरमुक्त करण्यासाठी केंद्र शासनाने उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस सिलिंडरचे वाटप केले. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला चुलीकडे गॅस सिलिंडरकडे वळल्या होत्या.
- मात्र मागील सहा महिन्यांपासून गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने ते सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहे.
- सुरुवातीला ४०० रुपयांना मिळणाऱ्या गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांना आता ९०० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे अनेकांनी गॅस सिलिंडरचा वापर बंद करीत पुन्हा चुलीकडे माेर्चा वळविला आहे.
......................
ऑगस्ट २०२० ते डिसेंबरदरम्यान झालेली भाववाढ
महिना घरगुती व्यावसायिक
ऑगस्ट ४६० १४९०
सप्टेंबर ५२० १५२०
ऑक्टोबर ५२० १५५०
नोव्हेंबर ६६४ १७००
डिसेंबर ६६४ १७४०
..................................
जानेवारी ते जुलैदरम्यान झालेली भाववाढ
महिना घरगुती व्यावसायिक
जानेवारी ६६४ १४५०
फेब्रुवारी ७६४ १४६०
मार्च ७६४ १८००
एप्रिल ७८९ १८४५
मे ८२० १८४५
जून ८२० १८४५
जुलै ८७५ १७४८